आय.डी. -(भाग -3)

   
"आय.डी." इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१  भाग-2

तिच्या आई.डी. च्या मागच्या बाजूला प्रेम पत्र ठेवून मी पहिलं पाउल तर उचललं होत पण तीचं उत्तर काय असणार होत ह्या विचाराने त्या रात्री काही झोप लागेना. तिला ते पत्र मिळालय का ? किंवा तिने ते वाचलंय का हे तिला विचारायची हिम्मत हि होईना. दुसरा दिवस उजाडला. छातीत धडधड वाढायला लागली होती ... ट्रेन मध्ये बसून ऑफिस ला निघालो . मन थाऱ्यावर नव्हत आज . "आज भेटेल का ती ? काय विचार केला असेल तिने? मेसेज करुया का तिला कि फोन करून विचारुया ? कि वाट पाहुया ?" प्रश्न,प्रश्न आणि फ़्क़्त प्रश्न होते डोक्यात त्या वेळी. मनाशी ठरवून तिला मेसेज केला ,
"आज भेटूया का स्टेशन वर ?"
पुन्हा उत्तराची वाट पाहत बसलो ...तब्बल अर्ध्या तासाने तिचा रिप्लाय आला...
"नाही ".......
तिचा "नाही" असा रिप्लाय पाहून हातपाय अक्षरश: गळून गेले
"का ?"
"काय झाल ?"
असे एका मागून एक माझे मेसेज सुरु झाले समोरून उत्तर आलं..
"आरे थांब,थांब किती ते प्रश्न ?" "मी आज आमच्या दुसर्या ऑफिस मध्ये जाणारा आहे सो, आज नाही भेटता नाही येणार "
तिच्या ह्या उत्तरामुळे ट्रैक वरून खाली उतरलेल माझ हृदय पुन्हा ट्रैक वर आल. पण दुसऱ्याचं क्षणी वाटलं , ती एवढी नेहमीसारखी माझ्याशी बोलली म्हणजे तिने पत्र वाचलं नसावं कदाचित. म्हणजे अजून टेन्शन जसं च्या तसं होत . "कधी भेटूया, उद्या ?" मी विचारल.
"हो..काही अर्जंट आहे का ?" तिने विचारलं .
"नाही,नाही काही अर्जंट नाही " अजून एक दिवस वाढला होता आमच्यातला .तो दिवस काहीकाही केला लवकर जाईना... दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या नेहमीच्या चहाच्या हॉटेल मध्ये भेटलो ...वेळेपेक्षा आधी मी पोहचलो. ती ठरलेल्या वेळेवर. ती आल्या पासून मी तिचा चेहरा वाचायचा प्रयत्न करत होतो ....तिच्या चेहर्यावरच्या प्रत्येक रेषेवर मी लक्ष देत होत आणि अंदाज लावायचा प्रयत्न करत होतो तिच्या उत्तराचा ..पण त्या आधी एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे ते पत्र तिला मिळायल आहे कि नाही ते ? बोलता-बोलता तिचा आई.डी. हळूच उलटा करून पाहिला पत्र तिथेच आहे का नाही ते पहायला. नव्हत पत्र त्या जागी. म्हणजे कदाचित तिने वाचलं असाव ...पण तिच्या चेह्रावरून काहीच अंदाज येयीना ... ना ती रागावली होती ,ना खुश होती. नेहमी सारखीच ती माझ्याशी बोलत होती . विचारावं का तिला ? असं खुपदा वाटलं त्या वेळी , पण नाही विचारलं.

महिना झाला पत्र देवून , पण तिच्या कडून काहीच उत्तर येयीना. माझ्या मनाची घालमेल सुरु होत होती.... किती दिवस हे चालणार? "हो" किंवा "नाही" ह्यापैकी तिचा निर्णय मला ऐकायचा होता. मनाशी पक्क ठरवलं उद्या काही झालं तरी विचारायचचं तिला. त्यादिवशी नेहमीपेक्षा लवकर ऑफिस मधून बाहेर पडलो ...तीची ट्रेन यायच्या आधीच प्लैटफ़ार्म वर जावून थांबलो , थोड्यावेळाने ती आली, मला समोर पाहून तीने विचारल "आज ह्या प्लैटफ़ार्म वर , आणि इतक्या लवकर " .
"हो , तुझ्याशी बोलायचं होत थोडसं."
"मग सांगायचं ना आधी मेसेज करून भेटलो असतो ना आपण , जावूदे काय बोलायचं आहे ?".. तिथल्याच जवळच्या एका बाकड्या वर आम्ही बसलो. तिच्या डोळ्यात मी पाहिलं , तीचे डोळे एकटक माझ्या कडे पाहत होते ..माझ्या शब्दांची वाट पाहत होते . मी हि आज थेट मुद्द्यावरच आलो
"तुझ्या आई.डी. च्या मागे लावलेलं पत्र भेटलं का तुला ? वाचलंस का ते तू ?" दोघेही शांत होतो.... आता मी तिच्या शब्दांची वाट बघत होतो ...तीन उत्तर दिलं
"हो !, भेटलं तुझं पत्र मला ,वाचलं मी ते ."
माझ्या मानातल्या एका प्रश्नच उत्तर मला मिळाल होत.मन थोडफार हलकं झालं. "मग काही प्रतिक्रिया किंवा उत्तर नाही दिलंस ? "

ह्या वेळी तिच्या उत्तरामध्ये खूप मोठा पौज होता ... मी तिला पुन्हा विचारलं
"काय झालं ?" "कसं सांगू आणि काय सांगू ? मीच द्विधा मनस्थित आहे " तीने सांगितलं
"द्विधा मनस्थिती ? म्हणजे ?" मी हि थोडा संभ्रमात पडलो . तीने सांगायला सुरुवात केली

"हो... तुझ पत्र वाचायच्या आधीपासूनच मला कळाल होत तुला मी आवडतेय ते..तुझ माझ्या वर प्रेम जडत चाललं आहे ते ...तुझ्या वागण्यातून मला जाणवत होत ते ...हॉटेल मध्ये माझ्या पर्स मधून पडलेल्या फोटोच्या पाकिटातून माझा फोटो काढून तुझ्या पाकिटात ठेवताना पाहिलं होत मी , पण मी काही नाही बोलले , कारण महित नाही पण माझ्या मनात पण तुझ्याविषयी काहीतरी वाटत होत...तुझ पत्र मिळाल तेव्हा तुझ माझ्यावार खरच प्रेम आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल. पण तेव्हा पासूनच मी द्विधा मनस्थित अडकलेय . कारण हि तसच आहे.. तुला कधी सांगितल नाही मी पण तुला भेटायच्या आधी पासून माझ एका मुलावर प्रेम आहे ..त्याच हि माझ्यावर प्रेम आहे . सगळ चांगल आहे आमच्यात . पण जेव्हापासून तू भेटलास ना मला , तेव्हा पासून तुझ्या विषयी माझी मानत ओढ निर्माण झालीय. प्रेम...प्रेम, नाही म्हणता येणार कदाचित पण काहीतरी आहे जे मला तुझ्याविषयी वाटत राहत. शब्दात सांगता नाही येणार... कदाचित हे सगळ वाईट असेल ..तू आत्ता माझ्याविषयी काय विचार करत असशील काही माहित नाही पण शेवटी मी हि माणूस आहे, माझ्या मनात एखाद्यीषयी ओढ निर्माण होण सहाजिकच आहे पण त्याला प्रेम म्हणन कितपत योग्य आहे माहित नाही...तू आवडतोस मला , नाही अस नाही ..पण फ़्क़्त तू मला आवडतोस म्हणून ..मी त्याला सोडून देन किंवा मी त्याच्या प्रेमाचा त्याग करावा का ?..मग तुला उत्तर काय द्यायचं हाच प्रश्न मनात सारखा घोळत राहतो , तुला नाही म्हणायला मन धजावत नाही आणि हो म्हणायला सुद्धा . "

ती एका मागून एक बोलत होती ..मी सुम्भा सारखा तिच्या कडे आणि तिच्या बोलण्याकडे पाहत होतो ...खरतर मी तिच्या "हो" आणि "नाही" ह्या पैकी एका उत्तराची वाट पाहत होतो .
ती बोलत होती "पण आज काय तो निर्णय घ्यायची वेळ आलीय..मी अस तुला उत्तर न देवून लटकवून नाही ठेवू शकत ... " मी माझे पूर्ण प्राण कानापाशी एकवटले होते .आणी तिने उत्तर दिलं

"नाही .... मी तुला "हो" नाही म्हणू शकत.. माझ त्याच्यावर प्रेम आहे "
तीचं "नाही" उत्तर ऐकून काचेला तडा जावा तेव्हा कसं वाटाव तसा काहीतरी माझ्या हृदयात झालं होत... पण तिला दाखवून न देता मी स्वताला सावरल... आतल्या आत मी रडत होतो पण मी तिच्यासमोर चेहऱ्यावर स्माईल घेवून होतो ... बेक्कार अवस्था होती त्यावेळी माझी. ती माझ्याकडे एकटक बघत होती.. आणि मी तिच्या कडे. डोळे काठोकाठ भरले होते...आणि तेवढ्यात तिने माझ्या गळयाभवती  हात टाकून "सॉरी" बोलत घट्ट मिठी मारली... काही कळायच्या आतचं माझ्या डोळ्यातलं पाणी काठ ओलांडून वाहायला लागल ... मी सावरू शकत नव्हतो स्वताला. तिच्या केसांवर हात फिरवत मी तिला सावरायचा फक्त प्रयत्न करत होतो ... गळयाभोवतीची मिठी तिने जरा ढिली केली त्या वेळी माझ्या आतून ती कायमची निघून जात असल्याचा फील येत होता. स्वतासोबत मी तिला सावरल. तिचा निर्णय मला मान्य होता. थोड्यावेळाने तिला तिच्या ट्रेन मध्ये बसवलं आणि मी पुन्हा त्याच बाकड्यावर येवून बसलो . ती तिथून गेल्यावर त्या बाकड्यावर एकटाच बसून खूप रडलो मी त्यादिवशी . अडीज-तीन तास तिथेच बसुन होतो . आतून काय वाटत होत ते मलाच माहिती होत ते नाही सांगू शकत मी. अगदी स्वताला सुद्धा नाही . घरी जावून झोपलो... झोप काही आलीच नाही त्या रात्री... नुसता कूस बदलत राहिलो . विचार करायला लागलो तेव्हा मला तिचा निर्णय योग्य वाटत होता ... तीच तिच्या प्रेमाबद्दल प्रामाणिक राहण योग्य होत , अस खरचं खूप कमी जणांना जमत असाव ...त्यातलीच ती एक होती . विचार करण्यात सारी रात्र सरली ..सकाळ झाली . थांबून कस चालेल ...सकाळी उठुन पुन्हा ऑफिस ला जायची तयारी सुरु झाली ॰ बैग उचलली ... बैगेच्या बाजूला बाटली ठेवायच्या जागी काहीतरी होत. "आई. डी." होता तिचा .. आई. डी. वरचा तिचा फोटो पाहून पुन्हा डोळे भरले आणि सारा फ़्लैशबैक डोळ्यांसमोरून धावून गेला. "इथे राहिला कसा आई.डी. ?, बहुतेक ती गळ्यात भेटताना . सांगाव का तिला ? " मोबाईल घेतला कॉल करायला तिला , लॉक स्क्रीन काढली समोर तिचाच मेसेज

"ठीक आहेस ना ?"
एक स्मायली रिप्लाय म्हणू सेंड केली आणि तिचा आई. डी. माझ्याकडे राहिलाय ते सांगितल .

          तिला पत्र देवून महिना उलटून गेला ..तो दिवस आणि आजचा दिवस खूप फरक होता पण तेच रोजचेच धक्के खात मी स्टेशन बाहेर पडत होतो...मेसेज वर बोलल्या प्रमाणे ती आई डी घ्यायला आली होती ... खिशात ठेवलेला आई डी बाहेर काढला आणि त्यासोबत पाकिटाच्या चोरकप्प्यात ठेवलेला तिचा फोटो हि काढून तिला देण्यासठी पुढे केला ..ती बघत होती माझ्या ह्या वागण्याकडे ..."आपण पहिल्या सारखं बोलू शकत नाही का ?" तिने विचारलं "तसं अजिबात नाहीये ... बोलू कि आपण..प्रेम जमल नाही आपल फक्त बाकी..." पुढ्च काही बोललोच नाही माझ्या हातातला आईडी आणि फोटो तिच्या हातात सुपूर्द केला आणि आम्ही आमच्या ऑफिस च्या दिशेने निघून गेलो .
-समाप्त

-प्रफुल्ल शेंडगे .

"आय.डी." इतर भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१  भाग-2