Pages - Menu

आय.डी -(भाग -२)

आय.डी (भाग -१) वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- भाग-१


फेसबुक मेसेंजर वरचा  तिच्या  मेसेज चा  नोटिफ़िकेशन माझ्या मोबाइल वर येवून धडकला. लगेच उघडायला नको मेसेज ...थोडी वाट बघुया. तिला काय वाटेल मी तिच्याच मेसेज ची वाट बघत होतो कि काय म्हणून थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला . पण मनाला धीर धरवेना २-३ मिनिटांच्या अंतराने मेसेज उघडला .

"Hiiiiiiii" आणि त्या सोबत एक छानशी स्माईली ...असा तिचा पहिला मेसेज.
 "Hi" मधल्या वाढत गेलेल्या "i" ची संख्या स्पष्ट दाखवत होती कि तिने मला ओळखलं असाव आणि तीही बोलण्यास उत्सुक असावी .
आता ह्या तिच्या Hi ला काय उत्तर देवू ...फ़्क़्त "hi,हेल्लो" उत्तर देवू कि आणखी काही ?.....
"hey hi....ओळखलंस का?" ..अस ,म्हणत मी माझ्या मेसेज ची सुरुवात केली.
त्यावर तिचा रिप्लाय "हो ओळखलं कि , आय डी रिटर्न करणारा ".
 तिच्या ह्या उत्तरावर आम्ही दोघेही हसलो.
मी गालातल्या गालात हसत हसतच पुढंच बोलन चालू ठेवलं .
त्यादिवशी चांगली १०-१५ मिनिट आम्ही चैट करत होतो ...
आता हा आमचा रोजचा दिनक्रम झाला होता ..रोज आम्ही फेसबुक वर बोलायचो.बोलताना तिच्याविषयीची ओढ वाढत जात होती .....खुपदा मनात वाटायचं तिला भेटाव म्हणून पण विचारायचं कसं हा यक्षप्रश्न होताच. एकदा बोलता बोलता तिनेच विषय काढला ,
"आपण एकाच स्टेशन वर येतो , पण आपण भेटत नाही, भेटूया का?"
 मी हि क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिल "चालतंय कि...तू सांग कुठे आणि कधी भेटूया ते. '
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याच प्लेटफार्म नंबर २ च्या बाकड्याजवळ आम्ही भेटलो .
 आज मात्र माझ्या आधी ती पोहचली होती..बघून तिला पुन्हा माझ्या मनात तीच पहिल्या दिवसाची फिलिंग जागी झाली.
"काय मग इथेच बसुया कि ...." माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिने उत्तर दिल .."चहा प्यायला जावूया?" मी अचंबित नजेरेने तिच्या कडे पहायला लागलो ...तिने हि प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारल
"काय झालं ?" "तू चहा पितेस ?",
 "हो ,का ?' तिने विचारलं .....
"काही नाही , सुंदर मुली चहा पीत नाहीत अस वाचल होत कुठेतरी मी "
"म्हणजे मी सुंदर आहे ?" तिच्या ह्या प्रश्नावर मी थोडा गांगरलो काय उत्तर देवू ह्या बुचकळ्यात पडलो .. सुंदर नाही अस म्हणन तर साफ चुकीचं ठरेल , आणि थेट हो म्हटलं तर ती काय विचार करेल .
"विचार करूण सांगतो " अस उत्तर टाळण्यासाठी एक मधलं उत्तर मी शोधून काढलं .
हॉटेल मधल्या टेबलावर , चहा च्या संगतीने गप्पांचा ओघ सुरु होता ..ती तशी खूप बोलकी आणि तिच्या समोर मी मात्र थोडा गप्पच ..कधी तोंडातून मनातलं बाहेर यायचं ह्या भीतीने दबकत-दबकत शब्द उच्चारणारा.


                       त्या दिवसापासून दिवसाआड आमची भेट व्हायची, कधीतरी सोबत चहा पिण्या इतपत मोकळा वेळ तर कधी फक्त तिच्या माझ्या लोकल येण्याच्या मधला वेळ.. तोही आम्हाला पुरायचा आम्ही दोघही एकमेकांशी घट्ट बांधले जात होतो... एखाद्या बेस्ट फ्रेंड सारखं ...
त्या दिवशीचा एक किस्सा ...हॉटेल मध्ये चहा पीत आम्ही बसलो होतो आणि चहा पिल्यानंतर तिने पैसे देण्यासाठी तिची पर्स उघडली (एक दिवस मी आणि एक दिवस तिने पैसे द्यायचे हे आम्ही... सॉरी-सॉरी तिनेच ठरवलं होत. )तोच तिच्या हातून पर्स खाली पडली आणि त्यातल्या सार्या वस्तू फरशीवर इतरत्र पसरल्या ... त्याच गोळा करता-करता तिच्या पासपोर्ट साइज फ़ोटोंच पाकीट माझ्या हाती लागल...त्या क्षणी काय माझ्या मनाला वाटल खरंच मला माहित नाही ..पण मी त्यातला एक फोटो हळूच काढून घेतला ..आणि माझ्या पाकिटाच्या चोरकप्प्यात ठेवला.....सोशल साईटवर वगैरे तिचे खूप फोटो आहेत पण एखाद्या निवांत क्षणी चोरकप्प्यातून हळूच तिचा फोटो काढून बघण्यातली मजा काही औरच होती ... तिच्या फोटो समोर मी एकटाच बोलत बसायचो ,तिला प्रपोज करायचा सराव करायचो ... पण ती समोर आली कि सगळी हवा फुस्स ...काय कराव- कस तिला सांगाव, सांगण गरजेचंच आहे का ? नाही सागितलं तर ? अशा असंख्य प्रश्नात मी गुंतत जायचो .

                 आणि मग युक्ती सुचली...माझ्या मनातले सारे भाव मी एका कागदावर उतरवले ..अगदी पहिल्या दिवशी मनात तिच्या वर लिहलेली चारोळी हि त्यात लिहली ...ते लिहलेल पत्र मी १०-१२ वेळा वाचल , काही चुकलय का?..काही राहुन तर नाही ना गेलं ह्याची खातरजमा माझ्याकडून चालली होती .डोक्यात मुन्नाभाई सारखा केमिकल लोचा सुरु झाला होता ..सगळीकडे तीच दिसायला लागली होती ...आता आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे हे पत्र तिला द्यायचं कस ?
               २-३ दिवस सोबत पत्र घेवून फिरत होतो पण तिला द्यायची हिम्मत काही केल्या होईना ..एकदा मग असाच तिचा आय. डी . हातात घेतला आणि तिच्या नकळत आय.डी. च्या मागच्या बाजूला हळूच ते पत्र ठेवून दिल...तिला कधी ते पत्र भेटेल..कधी ते ती वाचेल ह्याचा त्या वेळेला विचार नाही केला मी ...फ़्क़्त ते पत्र तीच्यापाशी पोहचलंय ह्यातच मी थोडाफार खुश होतो ..ते हि फ़्क़्त काही मिनिटांसाठी कारण पुढं काय घडणार होत ते मलाही माहिती नव्हत ...तिने हे पत्र वाचल्यावर तिची प्रतिक्रिया काय असणार होती ..कुणास ठाऊक ? 


              आज महिना उलटून गेला ह्या गोष्टीला ... आज पण तेच रोजचेच धक्के खात मी स्टेशन बाहेर पडत होतो....काय घडल होत ह्या महिन्याभरात ? सांगेण पुढच्या भागात ...

 -प्रफुल्ल शेंडगे
भाग-१  

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-