साथ

आजूबाजूला मंद प्रकाश पडलेला , अंगावर येनारी वार्याची हळुवार झुळूक , दुर कुठेतरी वाजणारं एखाद गाणं,माणसांची गर्दी ,गोंधळ आणि ह्या सार्यात एका कोपर्यात बसलेली "ती" दोघं. त्याच्या खांद्यावर तीच अलगद डोक ठेवून, दोघांच बारीकश्या आवाजात एकमेकांशी बोलन चालू होत. थोड्यावेळा साठी तो बोलायचा थांबला , त्याने तिचा हात हातात घेतला आणि पुन्हा बोलन सुरु केल , येणारे-जाणारे वळून वळून त्यांच्या कडे पहायचे , आणि पुन्हा आपल्या रस्त्याने पुढे निघून जायचे . दोघेही भलत्याच दुनियेत गुंगलेली .दोघांच्या बोलण्याला गर्दीचा किंवा तिथल्या आवाजाचा परिणाम होत नसला तरी ते येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि पुन्हा आपल्या गप्पात अडकून जायचे , चेहऱ्यावर नैसर्गिक समाधान तरीही डोक्यात प्रश्नाचं काहूर माजाव असे भाव दोघांच्या हि चेहऱ्यावर उमटले होते. सूर्य बुडण्याची वेळ झाली आणि अंधार पडायला लागला,आजूबाजूचे दिवे लागायला लागले, तशी त्यांच्या चेहर्यावरची काळजी अधिकच गडद व्हायला लागली होती. एका क्षणी तो उठला ,
"आता जावून काय उपयोग ?" अस बोलून तीने त्याला अडवलं ,
"पण काहीतरी कराव लागेलच ना ?" त्याने उत्तर दिल.

"काय करणार आपण ?" तिने प्रतिप्रश्न केला ,
ह्या वेळी मात्र त्याच्या कडे काहीच उत्तर नव्हत , तो तसाच पुन्हा खाली बसला. स्वतावर चीड आणत तो स्वताशीच पुटपुटत होता , ती मात्र त्याला शांत कारायचा प्रयत्न करत होती.

वेळ पुढे जात होती ,रात्रीचे सुमारे १०-११ वाजले होते , तेवढ्यात समोरून कुणीतरी त्यांच्या दिशेने येतंय अस त्या दोघांच्या हि लक्षात आल , दोघ हि त्या येणाऱ्या व्यक्ती कडे आशावादी चेहऱ्याने एकटक पाहत होते. ती समोरची व्यक्ती त्यांच्या पाशी आली आणि एक पिशवी त्यांच्या समोर ठेवून तिथून निघून गेली. तिने पिशवी झटकन उचलली आणि उघडायला लागली, आत हाथ घालून तिने पिशवीतून काहीतरी बाहेर काढल. पाहून तिच्या जीवात जीव आला , मघापासून असलेली चिंता काहीशी दूर झाल्यागत तिने त्याच्या कडे पाहिलं. त्यानेही काहीश्या चिंता मुक्त नजरेने तिच्या कडे आणि त्या पिशवी कडे पाहिलं , पिशवीतून काढलेल्या एका चपाती कडे आणि त्यात गुंडाळलेल्या भाजी कडे दोघही बघत होती. लगबगीने तिने तिच्या कुशीत निजलेल्या मुलाला उठवल आणि चपातीचा एकेक तुकडा तोडून त्याला चरायला लागली , तो हि बाजूलाच असलेल्या नळातून पाणी आणायला धावला, मुलाच्या पोटात जेवण जाताना दोघांच्या हि पापण्या ओल्या होत होत्या...बहुतेक आनंद आश्रुने. भुकेल्या त्या जीवाने आर्धी चपाती संपवली आणि "बास झाल " अशा अर्थाने मान हलवली. ,.

"तुम्ही खावून घ्या , मला भूक नाहीये " अस म्हणत तिने अर्ध्या राहिलेल्या चपातीचा तुकडा त्याच्याकडे दिला, त्याने नको म्हणत मान हालवली , पण ती काही ऐकायला तयार नव्हती , त्याने मग तिच्या कडून ती अर्धी चपाती घेतली आणि दोन भाग करून एक तिला आणि दुसरा स्वताकडे ठेवला...

"आज नाही भेटल काम, पण उद्या नक्की भेटेल..हातावरच पोट ना आपल थोडे हाल काढावेच लागणार ना?", तिने हलकेच मान हालवून त्याच्या बोलण्याला हो दिला,

"तुम्ही कशाला काळजी करता, मी आहे ना तुमच्या सोबत, भेटेल उद्या आपल्या हाताला काम. " अस म्हणत तिने त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला . आपल्या मुलाकडे पाहत, पोटातली आणि दिवसाच्या दु:खाची आग शमवण्याचा प्रयत्न करत ते दोघेही उरलेल्या चपातीचा तुकडा गिळत होते .

एक मात्र नक्की ....एकमेकाना समजुन घेत,प्रत्येक परिस्थितीत आपल्या माणसांची साथ-सोबत आसणं हेचं सगळ्या गोष्टींवरच रामबाण औषध असत.

-प्रफुल्ल शेंडगे.