तारुण्याच्या झळा




                       सिग्नल  बघितलाच असेल तुम्ही ... लाल ,पिवळा आणि हिरव्या दिव्यानी नटलेला . हे तीन दिवे मला तर ना माणसाच्या आयुष्यातल्या तीन टप्प्यांसारखे वाटतात .सर्वात खालचा हिरवा म्हणजे बालपण , वरचा लाल म्हणजे उतारवय आणि मधला पिवळा दिवा म्हणजे तारुण्याचा काळ. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ह्या आपल्या आयुष्याच्या टप्प्यां मध्ये आणि ह्या तीन दिव्यांमध्ये अस काय साम्य आहे ? तर , हिरवा दिवा असला कि रस्त्यावरच्या गाड्या मुक्त पाने धावायला लागतात , तसच बालपण असत मुक्तपणे जगता येणार  , लाल म्हणजे थांबण  ,उतारवयात सारी अवयव थकून जातात आणि माणसाला थांबायला लागत म्हणून हा लाल रंग , आणि आता पिवळ्या दिव्या बद्दल बोलायचं तर , ह्या पिवळ्या दिव्याला काही महत्व नसल्यासारखं आपण त्याच्याकडे पाहत असतो अगदी तसंच तारुण्यात आलेल्या आमच्या सारख्या मुलांकडे सार जग पाहत असत . "अरे एवढा मोठा गधडा झालास, लहान आहेस का तूला सगळ सांगायला ? लय मोठा झाला का तू ? , तुला काय समजतं ? किंवा मोठ्या माणसांसारख लय समजतंय का तुला? अशी एक ना एक बोलणी रोजच तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐकून घ्यावी लागतात . अहो फ़्क़्त घरातलाचं कशाला अगदी बाहेर कामाच्या ठिकाणी सुद्धा ह्या तारुण्याच्या झळा सोसाव्याच लागतात , उदाहरण द्यायचंचं  झाल तर " अरे तुम्ही तरुण मुलं , भरपूर काम करायला पाहिजे तुम्ही ,कसे आजारी पडता रे तुम्ही ह्या वयात ?,कसे थकता रे तुम्ही एवढंसं  काम करून, आम्ही आमच्या तरुणपणी किती काम करायचो माहिती आहे का ?  , कशाला पाहिजेत रे तुम्हाला सुट्ट्या?,  तुम्हाला का घर संसार आहे का ? पस्तीसी-चाळीशी नंतर करा कि मजा,आता  तुम्ही लहान आहत .  अशी  अनेक ठरलेली वाक्य  सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत ऐकावी लागतात (चं).अशा वेळी मात्र  मनात व्दिधा स्थिती निर्माण व्हायला लागते , आपण खरचं मोठे झालोत कि आपण लहान आहोत ? लहान म्हणून जगायचं तरी बोलन खायचं आणि मोठ म्हणून जगायचं तरी बोलन खायचं अशी अवस्था होते . पण सांगणार तरी कुणाला ? ऐकणारे आहेत तरी कोण ? आणि  ऐकणारे असले तरी समजून कोण घेणार हा प्रश्न असतोच .


जबाबदारी , कर्तव्य , मान-सन्मान , काळजी , अशा अनेक गोष्टींच ओझ घेवून, त्या सांभाळत जगणाऱ्या ह्या तरुण पिढी कडे पाहतो तरी कोण आणि कसा ?   आमच्याकडे फ़्क़्त उनाड , बेशिस्त ,विचारशून्य , स्वताच्या गुंगीत राहणारे अशा नजरेने का पाहता ? खरच  तुमच्या तरुणपणी इतकेच आदर्शवादी राहत होता का ,जितक्याची अपेक्षा तुम्ही करता आहात तितके ? अपेक्षा करण किंवा सांगण काहीच चुकीचं नाहीये , आम्हालाहि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहेच , पण किमान आम्हाला समजून तरी घ्या . शेवटी आम्ही हि माणसच आहोत.

 रस्त्यावरची वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जशी फ़्क़्त  लाल आणि हिरव्या दिव्याची गरज नाही लागत, लाल आणि हिरव्या दिव्याच्या मध्ये जो  पिवळ्या दिव्यासाठी वेळ दिला जातो तो आयुष्याच्या टप्प्यांमधल्या
दिव्याला अर्थात तारुण्याला पण द्या, उगाच नको फ़्क़्त उठता बसता शब्दांची बोचणी, खुलुद्या दया त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वताच्या सूर्यप्रकाशात ....आणि बसलेच चटके उन्हाचे तर आहेच की तुमची सावली...ती ठेवूच आम्ही ध्यानात .

-प्रफुल्ल शेंडगे

आरसा





रोज सकाळी आपण सारेच जन आरशा समोर उभ राहून स्वता:ला न्याहाळत असतो .  पण फ़्क़्त स्वतःच्या बाह्यवर्णनाला. अंतरंगात ढुंकून पाहता येणारा आरसा अजून तरी काही अस्तित्वात आला नाही .अगदीच अस्तित्वात नाहीये अस नाही , दुसऱ्यांच्या नजरेत आपल्या अंतरंगाचा आरसा ठळकपाने दिसत असतोच कि. पण हा खरा आरसा कि खोटा हे कस ओळखायचं ? खरा-खोटा म्हणण्या मागे कारण हि आहे ते म्हणजे, आपल्या नेहमीच्या आरशात समोर जे काही, जस येयील तसं तो दाखवत असतो पण नजरेच्या आरशाचं मात्र तस नसतं ,कारण ह्या नजरेच्या आरशाला त्या माणसाची स्वताची मतं चिकटलेली असतात . मग तुम्ही कितीही चांगले वागत असलात तरी समोरचा तुमच वागणं ज्या पद्धतीने घेतो त्याप्रमाणे तुमच्या वागण्याचं प्रतिबिंब त्याच्या नजरेत उतरतं असत . जो तो त्याच्या सोयीप्रमाणे आपल्या वागण्याचा अर्थ काढत राहतो .आणि मग कधी कुणाच्या नजरेत आपल्या बद्दल ची काही नकारत्मक प्रतिबिंब पाहिली कि मनात अस्वस्थता निर्माण होवून चिडचिड व्हायला होते . "माझ म्हणन-वागण कुणाला कळतच का नाही ?, एकदा माझ्या बाजूने विचार करून बघा , एकदा माझ्या जागी स्वताला ठेवून बघा .  " असे एक ना अनेक वाक्य ऐकायला मिळतात किंवा समोरच्याला ऐकवावे  लागतात.


पण समोरचा आपल्या बद्दल कसा आणि काय विचार करत असेल हे हि पाह्ण्याच तंत्र कुठाय आपल्याकडे ? मग वाट्त राहत  केदार शिंदेच्या "अग्ग बाई अरेच्चा " सिनेमातल्या साराखं आपल्याला सामोरच्याच्या मनातल कळायला हवं  होतं . दोन क्षणा साठी का होईना समोरच्याच्या नजरेने आपण स्वता:ला बघू शकायला हवं होतं , कुणी आपलं का कौतुक कराव किंवा कुणी आपल्याबद्दल का वाईट का बोलत असेल हे स्वताला समजायला हवं होतं .


पण ह्या झाल्या साऱ्या जादुई कल्पना , अस काही होणं तसं अवघडचं ! कारण माणसाच्या मनाचा काही भरोवसा नाही . जिथ आपलच मन किती वेळा एका गोष्टीवरून, मतावरून उड्या मारतं  मग बाकीच्यांच्या मनाची किंवा विचार करण्याची पद्धत कशी काय आपल्याला उलगडणार ?
पण ह्या सार्यांवर एक उपाय आहे, आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून  काम करणं. आणि जर आपण आपल्या मनाशी प्रामाणिक वागत असलो तर मग समोरचा आपल्या बद्दल काय विचार करतो हे जाणून घेवून त्याचं पद्धतीने वागण्याची तशी फारशी गरज उरणार नाही. शेवटी जसं समोरच्याची नजर आपल्या अंतरंगाचा आरसा दाखवते त्याप्रमाणेच आपल मन सुध्दा आपल्या वागण्याचा आरसा असतोच कि आणि तो हि साधासुधा नाही "स्नोव व्हाईट" च्या कथेतल्या जादुई आरशासारखा जो कधीच खोटं बोलतं नाही, अगदी तसाचं  .

-प्रफुल्ल शेंडगे.

प्रेमाची ज्योमेट्री(भूमिति)

ती जणू 'केंद्रबिंदु '
मी तिचा 'परिघ' होतो.
कुठेही असलो तरी
तिच्याच भोवती फिरत होतो.

तिच्या माझ्या 'त्रिज्ये' मध्ये
नवा 'ट्रायंगल' पॉइंट आला.
मला बाजुला सारून
त्यांचा एंगल सेट झाला.

ट्रायंगल च्या दोन बाजुंचे
कालांतराने 'चौकोण' झाले.
'(e)x ' च्या शोकात ,माझे
न सुटनारे equation झाले.

चौकोनाच्या आयुष्यात
पहिल्या वर्षी 'पंचकोन ' ;
दुसर्या वर्षी छोटा 'षटकोण' आला.

नव्या केन्द्रबिंदु भोवती
माझा पुन्हा परिघ झाला.

-प्रफुल्ल शेंड्गे
Http://prafulla-s.blogspot.in

बाप्पा बोलला आज....

     गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तितक्यात लाइट् गेली ,स्पीकर वर वाजनारी गाणी बंद झाली आणि एक अद्भुत शांतता पसरली . माझ लक्ष बाप्पा कड़े गेल ,बाप्पा  स्वता:शीच काहीसा पुटपुटताना दिसला...मनात विचार आला काय बर बोलत असेल बाप्पा स्वता:शी ?...आजुबाजुला कोणी नसल्याच पाहत विचारायच धाडस केल..."काय झाल बाप्पा?" पण बाप्पा काहीच न ऐकल्या सारखा बघत होता मी पुन्हा प्रश्न केला...तेव्हा बाप्पा नि माझ्या ओठांची हालचाल पाहिली आणि कानात हात घालून कापसाचे बोळे बाहेर काढले...धक्काच बसला मला बाप्पा ला विचारल काय रे हे बाप्पा तू कानात कापसाचे बोळे घालून बसलास? आणि काय पुटपुटतोयस स्वता:शिच?
नाराजीच्या सुरात बाप्पा नि उत्तर द्यायला सुरुवात केलि, "काय करू रे,वैताग आलाय,किती आनंदाने तुमच्या कड़े यायला निघालो होतो,किती खुश होतो काय सांगू तुला...पण इथ येवून सारा हिरमोड झालय बघ.

     वाटल होत तुमच्याशी संवाद साधता येईल...तुमच्या चेहर्यावरचा निरागस आनंद पाहता येईल पण  इथे येईपर्यन्तच नको नकोस वाटायल लागल होत मला...येताना रस्त्यावरुण माझी मिरवणुक काढत इथपर्यन्त आणल ...रस्त्यातल्या खड्ड्यातुन येताना पूर्ण पाठ दुखायला लागली आणि त्यात ह्यांचा धांगडधींगा...मोठ्यानी गाणी,ढोलताशा चा गजर,त्यावर ह्यांचे वेडेवाकडे डांस, बस वर चढून नाचण ,रस्ता आडवूण,इतराना त्रास देवून मला कस काय प्रसन्न करणार ? बरं...मला चार-चार हात दिलेत,पण त्यापैकी तिन्ही हातात काहीना काही दिलय मग काय आशीर्वादाचाच हात मी स्वताच्या कपाळा वर मारून घेतला...मग आशीर्वाद कुणाला कसा काय देवू?
ते हि कमी की काय म्हणून मला इथ येवून बसवलं आणि माझ्या दोन्ही काना शेजारी दोन स्पीकर आणून ठेवलेत....त्यावर सतत जोरजोरात गाणी सुरूच असतात...पहिल्यांदाच मला माझ्या ह्या मोठ्या कानांचा पश्चाताप होतोय. म्हणून मी कानात बोळे घालून बसलोय आणि त्यामुळे माझ्या दर्शनाला आलेल्यांच म्हननं ही मला ऐकायला येत नाहिये ,तुम्हाला तरी तुमच स्वताच म्हनन ऐकायला येतय का? नाही ना ? तरी नंतर तुम्हीच म्हणता की बाप्पा आमच ऐकतच नाही..आता तूच सांग मला कस काय तुमच म्हणन ऐकू येईल?

      ही तर सार्वजनिक मंडळा मधली माझी अवस्था पण घरगुती गणपति मधली ही अवस्था वेगळी नाही...आधी मी आलो की घरातले सगळी माणस एकत्र यायची,गोतावळा जमा व्हायचा,घरातली सारी माणस कशी खुश, उत्साहित असायची,एकमुखाने आरती गायची. आता मात्र कुटुंब विभक्त झालीत, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा गणपति...मग काय सर्वानी एकत्र यायची प्रथा बंदच झाली,एकमुखाने गायली जाणारी आरती ही आता CD /कैसेट्स लावून गायली जाते,भक्तीचा ओलावा राहिलाच नाही कुठे. माझ्या नावाने स्पर्धा सुरु झाल्यात, ह्यानी 5 फुट उंच मूर्ति आणली की तो 10 फुट आणतो, ह्याने इतक्या रुपयाची सजावट केलि की दूसरा त्याच्या पेक्षा जास्त खर्च करायला लागतो.पण ह्याना का कळत नाही मला नको ही असली सजावट, नको हां मोठेपणा,तुमचा साधेपणा,त्यात असलेली निखळ,निरागस भक्ति चा भुकेला आहे मी,लाडू-मोदक नसले तरी मी रागवत नाही रे.आजकल तर माझा उपयोग  फक्त सेल्फ़ि घेण्यासाठी, आणि तो सोशल साईट वर टाकण्या साठीच उरला आहे. एक-एकदा वाटत निघून जावं तुमच्यातुन ,पुढच्या वर्षी ही न येण्यासाठी पण काय करू काही जन आहेत जे मनापासून मला बोलावतात त्यांच्या साठी मला यावच लागत...हे तर वर्ष गेल पण पुढल्या वर्षी तरी असल काही करू नका...सण करा रे पण त्याचा त्रास होउ देवू नका.

          बाप्पा बोलत होता पण अचानक त्याचा आवाज माझ्यापर्यन्त येनं बंद झालं,लाइट्स आल्या होत्या आणि स्पीकर मधली गाणी पुन्हा जोराने वाजायला लागली होती, मी बाप्पा कड़े पाहत तसाच उभा होतो , बाप्पा मात्र पुन्हा कापसाचे बोळे कानात घालून स्वताशिच पुटपुटायला लागला.तितक्यात मागुन कोणीतरी आवाज दिला.."चला पुढे,लोकाना दर्शन घ्यायचय"...आणि मी तिथून बाहेर पडलो ते बाप्पाच्या म्हणन्याचा विचार करतचं.

-प्रफुल्ल शेंड्गे

चाय पे चर्चा

थांबा ! थांबा !! ...नाही...नाही मी काही कुठल्या राजकीय विषयावर नाही बोलत आहे . ही "ती" वाली  "चाय पे चर्चा " नाहीये , अहो मी तर आपल्या चहा बद्दल बोलतोय . तुमच्या , आमच्या कपातल्या चहा बद्दल . काय म्हणता चहाचं नाव काढल आणि तुम्हाला ही चहा पिण्याची तलफ झाली ? मला ही तसचं वाटल  म्हणून आधीच सोबत चहाचा कप  घेवून बसलोय ..म्हणजे  तुमच्याशी बोलताना सोबत एक-एक घोट चहा असला ना कस मस्त वाटत . आssssssहा काय चहा आहे ....व्वा ....मस्त.

चहा बद्दल वेगळ काय सांगायचं ...आपल्या सगळ्यांची सकाळ ज्या गोष्टीविना अधुरी आहे तो म्हणजे चहा . एका हातात सकाळचा वर्तमान पेपर दुसर्या हातात चहाच्या कपाचा कान  ,पेपर ची एक हेडलाईन आणि त्यासोबत चहाचा एक-एक घोट सकाळची आणि दिवसाची छानशी सुंदरशी सुरुवात करून द्यायला पुरेसा आहे .

जसं आपण आपल्या दररोज च्या आयुष्यात चहाला स्थान दिलय त्याप्रमाणे चहाने  ही आपल्याला सांभाळून घेतलं आहे ....काय म्हणता ? कस ? अहो बघा ना , बेड-टी च्या नावाखाली आपण न तोंड धुता चहा प्यायची सवय लावली खरी पण चहा नि कधी तुमच्या समोर नाक मुरडलयं का? ...न तोंड धुता का मला पितोस असं कधी विचारलयं का?  नाही ना ?  सकाळचा नाश्त्याला दुसरं काही नाही मिळाल तरी अगदी चहा-चपाती ने ही काम होत आपलं, अगदी कंटाळा आला तरी तो घालवण्यासाठी चहा लागतोच...शाळेच्या दिवसात परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करताना आईने बनवून दिलेला चहा असो किंवा कॉलेज कट्ट्या वर मित्रांसोबत ची  कटिंग चाय ....थंडी ची लाट किंवा पावसाच्या सरी आल्या की ओघाने चहा आणि भजी चा बेत आलाच ...ऑफिस मध्ये तर चहा नि आम्हाला खूप सांभाळलय , किंबहुना ,ऑफिस ला जाण्याच्या कारणा मध्ये चहा ही एक आहेच ... आमच्या ऑफिस चा चहा जरा वेगळाच असतो...उकळलेलं रंगीत पाणी ;फक्त कैंटीन वाला ते कपात देतो म्हणून त्याला चहा म्हनाव लागतं इतकचं . असो ...पण हाच चहा दुपारच्या जेवना नंतर येनारया सुस्तीला पळवुन लावण्यासाठी पुरेसा होतो.


तसं ही आपल्याकडे आजकल चहा फक्त पिण्या पुरता विषय राहिला नाहिये..तुम्हीच बघा ...कुठल्या ही कामाला "चहापाणाला" पैसे द्यावेच लागतात...संसदेच असो किंवा विधानसभेच अधिवेशन...विरोधाकांचा "चहा पाणावर बहिष्कार" ही बातमी वाचल्याशिवाय अधिवेशन सुरु झालयं ते कळतचं नाही. कुणाला सांगू नका पण लोक म्ह्नातायेत की ह्यवेळच्या निवडनुका चहानेच जिंकुन दिल्यात..ते काय म्हणतात ना 'चाय पे चर्चा' करुण. अहो राजकारणच कशाला "गरम चाय की प्याली" असो किंवा "मम्मी ने चाय पे बुलाया है" ह्या गाण्यातून समजतं की चहा नि बोलिवूड़ वर ही मोहिनी घातली आहे ते ..."चाय पे बुलाया" वरुण आठवलं ; डेटिंगच्या वेळी "कॉफ़ी प्यायला जावुया" अस म्हणून जरी सुरुवात होत असली तरी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलगी जोपर्यन्त चहाचा कप घेवुन येत नाही तोपर्यंत पुढची चर्चा होतचं नाही...तसचं आपल्याकडे एखादे वेळी पाहुण्याला जेवण नाही विचारल तरी चालेल पण चहा विचारलाचं पाहिजे असा अलिखित नियम आहे म्हनुनच की काय चहां आपला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित झालाय.

काहीजन म्हणतात चहा शरीराला चांगला नाही बुवा..असेल ही . पण आमच बुवा चहाशिवाय पान ही हालत नाही...अगदी कधीही चहा प्यायला सांगितल तरी आम्ही तय्यार... अगदी झोपेतून उठवलं तरी चालेल. काय म्हणता तुमचं ही असचं आहे का माझ्यासारखं ? तर मग ह्याच गोष्टी साठी होवून जावुद्या आणखी एक कप चहा?

-प्रफ़ुल्ल शेंड्गे

हेवा

                 


                     "नशीब चांगल आहे यार त्याच , मस्त नोकरी आहे त्याला ,  पगार ही गलेगठ्ठ, मला ही असा पगार मिळायला पाहिजे  , गाडी बघितली का त्याची, नाहीतर माझी "खटारा" , घर पण मस्तच आहे ..नाही तर मि राहतोय आज ही खुराड्यात  " .....काय विचारताय   कोण बोलतय हे सार आणि कुणाबद्दल ? अहो , तुम्हीच बोलताय कि , तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही नाही आपण सारेच ह्या पंगतीत येतो ... आपण किती दु:खी आणि आपल्याकडे काय-काय नाही आणि दुसर्याकडे किती सुख आहे ह्याची बाराखडी आपण रोजच गात असतो .देवाने- नियतीने  सारी दु:ख , हाल अपेष्टा आपल्याच पदरात टाकल्या सारखी आपली ओरड चालू असते ...माझ्या कडे 'हे' असल असत तर ... अस झाल असत ...आणि 'ते' असल असत तर मी ही 'तस' करून दाखवलं असत... आपल्यालाला ना दुसर्यांचा हेवा करायची सवय लागलीय , आपल्याला कितीही आणि काहींही मिळाल तरी आपण मात्र समाधानी काही होत नाही कारण आपल्याला जे मिळालय त्यापेक्षा दोन थेंब का होईना दुसर्याकडे जास्त असतचं आणि  आपण फ़्क़्त त्याचाच विचार करत राहतो पण आपल्या पेक्षा दोन थेंब कमी मिळालेल्या कडे आपण साफ दुर्लक्ष करत असतो , आपल्याला कुणापेक्षा तरी जास्त मिळालय  ह्याचा विचार आणि जे काही मिळालंय त्यात सुख मानन सोडूनच दिलय आपण . ५ हजाराच्या ही नोकरीतही  जे भागत होत ते आज २०-३० हाजाराच्या नोकर्या करूनही पूर्ण होत नाही , आपल त्यात भागत नाही . ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या वाढत चालेल्या गरजा आणि हाव .  2 चाकी गाडी आली कि वेध लागतात 4 चाकीचे , 1BHK रूम असली तरी कुणाकडे तरी आपण 2BHK रूम पाहतो आणि आपल्या ही मनात मोठ्या घराची हाव वाढायला लागते ..अशा अजून कित्येक सार्या गोष्टी आहेत माणसागणिक त्या बदलत जातात इतकचं .
कधी कधी वाटत माणसाला स्वताला  काय मिळाल नाही ह्याच दु:ख मुळात नसतच कधी , पण जे आपल्याला हव असत ते दुसर्या कुणाला तरी मिळालय ह्याचा विचारच त्याला जास्त त्रास देत असतो .

                              आता तुम्ही म्हणत असाल ...असा विचार करणं काय चुकीच आहे का ? मोठी स्वप्न बघन पाप आहे का ? आम्ही आमची प्रगती करू नये का ? नाही..नाही माझ तस अजिबात म्हणन नाही . स्वप्न बघन , विचार करण हा आपला अधिकारच आहे .पण फ़्क़्त विचार करून , दुसर्याचा हेवा , इर्षा करून आपली प्रगती थोडीच का होणार आहे ?, आपल्याला जे समोरच्याकडे  दिसतंय ते मिळवण्यासाठी समोरच्याने किती मेहनत , कष्ट केली असतील ह्याचा आपण कधी विचार करतो का ? नाही ना ? आपण तेवढ कष्ट करायला तयार आहोत  का ? ह्याचा कधी विचार केलाय का ? अहो ,नविन काही मिळवण्यात काहीच गैर नाही पण जे आपल्याकडे कडे आहे ते ही कित्येकाकडे नाही ते ही विसरून कस चालेल , म्हणून म्हणतोय आपल्याकडे आहे त्यात समाधान मानून जगल तर आपल्यासारखेच सुखी बहुतेक आपणच होवू... म्हणून काही नविन मिळवण्याची धडपड मात्र सोडू नका..प्रामाणिक प्रयत्न करा ,कष्ट करा..तुम्हाल जे हवं आहे ते सारं मिळेल फ़्क़्त मनात जिद्द आणि संयम तेवढा ठेवा .

-प्रफुल्ल शेंडगे .

सिनेमा

काय रे ह्या आठवड्यात कोणता पिक्चर आलाय? अमुक हीरोचा ,तमुक हिरोईन चा सिनेमा कधी येणार आहे? काय मस्त होता ना सिनेमा, काय अभिनय केलाय, एक नंबर कथा होती....असे संवाद नेहमीचे झालेत. काही वर्षांपूर्वी सिनेमाला भारतात सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता सिनेमानि आपल्या मनावर गारुड घातल...पौराणिक,घरगुती,रोमांटिक, हौरर अश्या अनेक साच्यातले सिनेमा बनत राहिले किंबहुना आज हि बनतायेत , काही वर्षां पासून सामजिक प्रश्नांवर भाष्य करणारे, आपल्या आजुबाजुला घड्नारे प्रसंग ,गोष्टीचा सिनेमाच्या कथेत प्रवेश झालाय. सिनेमातली कथा, त्यात दाखवले जाणारे प्रसंग आपल्याला आपल्याच जगण्याचे भाग वाटायला लागले...कधी कधी आपलही आयुष्य असच फ़िल्मी असाव ....सगळ चांगल व्हाह, सिनेमातल्या हीरो-हिरोइन सारख आपल आयुष्य असाव अस वाटायला लागल ...मग त्यांच्या दिसन्याची,वागण्याची कॉपी करन सुरु झाल...अगदी हेअरस्टाइल पासून ड्रेसिंग स्टाइल पर्यन्त सगळ कॉपी ...
सलमान सारखी बॉडी, रणवीर सारखा लुक , करीना सारखी झिरो फिगर ,शाहरुख सारखा रोमांटिक पणा, अस एक ना एक सुरु असतच नेहमी आपल.पण आजकल आपन फक्त सिनेमालाच आपल आयुष्य आणि जग मानत चाललो आहे...जगात घडणार्या गोष्टीना आम्ही फक्त सिनेमातच पाहतोय आणि जगतोय...आता पाहा ना सैराट सारखा सिनेमा येतो तेव्हा आम्हाला औनर किलिंग बद्दल ची दाहकता कळालि, तिहि फक्त त्या सिनेमा पुरती मर्यादित...सिनेमातल्या हीरो-हिरोइन ची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्याना पाण्याची धार लागली, अनेकांची मन अस्वस्थ झाली होती, न्यूज़, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर आपन किती अस्वस्थ झालो होतो ते आपण सार्यानिच पोस्ट केलि असेल...पण हेच जर आपल्या आजूबाजुला खरखुर घडल तर आपन सरळ सरळ डोळेझांक करतो...फँड्री सारखा सिनेमा जातिव्यवस्था दाखवतो,उड़ता पंजाब सारखा तरुनायित वाढत चाललेल्या व्यसनावर प्रकाश टाकतो, मिल्खा सिंग, मेरी कोम,पानासिंग तोमर सारखे खेळाडु आपल्याला माहिती ही नव्हते ते ही आपल्याला सिनेमानीच दाखवले ...नट सम्राट, बाग़बाण सारखा सिनेमा येतो तेव्हा आई वडिलांच दुःख समजत ,स्लम डॉग मिलेनिअर सारखा सिनेमा झोपड़पट्टीत राह्नार्यांची अवस्था दाखवतो आणि आपन वर वरची हळ्हळ व्यक्त करतो पण समोर एखादा भुकेला जिव आला तर आम्ही नजरा फिरवून घेतो.का करतो आपन अस? कारण आपन ह्या सार्या विषयाना फक्त सिनेमा पुरत त्या अडिज-तिन तासांपुरता मर्यादित ठेवलय..
...हो ना?  सिनेमा चालु आसेपर्यन्त किंवा पुढचे काही तास, दिवस आमच्यात जोश येतो आणि त्यानंतर मात्र आपन सार विसरून जातोय, पुन्हा आपण थंडगार....वाट पाहत राहतो नव्या आठवड्याची ....सोबत येणार्य नव्या सिनेमाची...

-प्रफ़ुल्ल शेंड्गे

पाउस






पाउस ...... आला बुवा एकदाचा पाउस ...गेले 4-5 महिने गरमिने आणि दुष्काळाने त्रासलेले आपण सारेच पावसासाठी आतुरलो होतो ... थोडासा उशीर झाला यायला पण "देर आये दुरुस्त आये " म्हणत सार्यांनीच वरुण राजाच  स्वागत केलय ...आता पुढचे 4 महिने बेदुंध होत तो कोसळत राहणार, डोंगर माथ्यावरून कोसळत , नदी नाले तुडूंब भरून वाहु लागतील , सार्या धर्तीवर हिरवा शालू पांघरला जायील.... . हो हो माहिती आहे ....तुम्हाला हे सार माहिती आहे ते , लहानपणी तुम्ही निम्बंधात हेच सार किंवा असच वर्णन केलय..हो ना ? मि सुद्धा असच लिहित होतो ...लहानपणीचा पाउस होताच तसा खरच विलोभनीय आणि मनाला आनंद देणारा  , पण आधीसारख आपण पावसाकड़े पाहतोय का? एन्जॉय करतोय का पाउस?...

पाउस आला कि होणारी कीच-कीच, तुंबणारे नाले , तुम्बणारी गटारी , रस्त्यावर साठणार पाणी असो किंवा रस्त्याच्या खड्ड्यात होणारी डबकी , रस्त्याच्या बाजूला पसरलेला कचरा , प्लास्टिक , रस्त्यावर पसरलेलं वाहनातल तेल , त्या सार्यातून दररोज च्या जगण्याची धडपड , पावसासोबत येणारा नेहमीचा ट्राफिक जाम असो किंवा रेल्वेची होणारी रखडगाडी , त्यामुळे होणारी गर्दी, गर्दीतले  ओले-ओले स्पर्श , ओल्या कपड्यांचा सुटणारा कुमट वास , अगदी जीव नकोसा करायला लागतो ...तरी नाक दाबून जगन चालू असत ...

आधी पाउस म्हटला कि कागदांची होडी बनवायची स्पर्धा आता स्वताला सिद्ध करायच्या स्पर्धेत हरवत चालली आहे , चहा-भजी आणि भाजलेली कणस आता  फ़्क़्त पोट भरण्यासाठी खाल्ली जातायेत , त्यातली मजा घ्यायला वेळ आहे कुठे ?  , पहिल्या पावसात भिजण  आता इतिहासजमा झालय , खिशातल पाकीट आणि मोबाईल पावसातल्या भिजण्याच्या आनंदापेक्षा महत्वाचा  झालाय....साध खिडकीतून येणार्या पावसाच्या थेंबा ना  ही आम्ही झटकन खिडकी बंद करून स्वता पासून दूर सारतोय...गेलोच जरी कधी पावसात फिरायला तरी आपण कुठे एन्जोय करतो मनमुराद , जातो ते फ़्क़्त  कॅमेरात स्वताचे फोटो कैद करण्यासाठी आणि ते फोटो आणि स्टेटस  सोशल मेडिया वर उपलोड करण्यासाठी इतकच  ...प्रोफेशनल जगण्याच्या नादात आम्ही स्वताच कुठ तरी आम्ही आमच मनातलं बालपण मारून टाकलय सोबत मारलाय तो लहानपणीचा हवाहवासा वाटणारा पाउस .

काय म्हणता ? तुमचीही अवस्था अशीच आहे माझ्यासारखी ?...मग काय कराव बर ? एक होवू शकत ...बघा जमतंय का ? आपण सर्वांनी  ह्या वर्षीचा पाउस पुन्हा लहानपणी सारखा जागून पाहूयात का ? दररोज नाही किमान एक दिवस तरी देता येयील ना  आपल्या या लाडक्या पावसाला ... ही पावसाची 4 महिने सरून गेली तर पुढची 8 महिने त्याला फ़्क़्त आठवण्यातच  काढावी लागतील आणि तेव्हा वाटत राहायला नको की पावसात भिजण राहून गेल म्हणून. सो लेट्स एन्जॉय .

-प्रफुल्ल शेंडगे


    

   

चारोळ्या... मनातल्या .

तनहा तनहा रातो में
अश्को का यूँ बहना ।
बरसती तेरी यादो में
मेरा बिन चाहे संभलना ।

जारी है आज भी,
दिल की तेरी गलियों में
मेरा खुदको ही तलाशना ।
प्यार भरी नजर के लिए तेरे
मेरा रोज का यूँ तरसना ।


****

तुझसे एक बार बात करनी थी
आखरी ही सही मुलाक़ात करनी थी
दे देता तुझे हर एक जवाब
बस एक बार तू सवाल तो पूछ लेती थी

****

आज सगळच कस शांत शांत...

तुझ्या डोळ्यातले शब्द
ओठातल गाण
गालातल हसण
आणि लाडातल बोलण

तुझ्या हातातल कंगन
छुमछुमणार पैंजन
तुझ्याशिवाय वाहणारा किनारा
आणि भुनभुननारा वारा

आज सगळच कस शांत शांत...

****


भावनेला शब्दांची तशी गरज नाही
पण सांगने ही तुला भाग आहे
तू वाचावे मनातल्या शब्दाना माझ्या
म्हनुनच कविता मी लिहित आहे

****

ठरवून तुझ्याशी खुप काही बोलायच असत
पण सार विसरून जातो
शब्दात असा अडकत जातो की
स्वतालाच तुझ्यात हरवून बसतो

****

माझे मन समुद्राच्या लाटा,
तू भासे मज एक किनारा.
अविरत तुलाच येवून भेटे,
मी सोडून समुद्र सारा.

****

चेहरा तुझा बोलत होता
डोळे माझे तुला वाचत होते
ह्या सारयात शांत फक्त
तुझ्या माझ्यातले मौन होते

साठवून ,दडवून मनात गुपित
तू जगात सार्या वावरत होतीस
बहुतेक दुनियेच्याच भीतीने,
सार्यांसमोर... तू माझ्यासोबत गप्प होतीस.

****

कधी कधी वाटत उगाच तुझ्याशी भेटलो
छान सरळ होत आयुष्य,का स्वताला अडकवून घेतल?

भेटलो जरी आपन , तरी का तुझ्या प्रेमात पडलो?
मुक्त माझ्या मनाला,का तुझ्यात गुंतवून ठेवल?

गप्प राहून प्रेम करण का मला उमगल नाही ?
नकार तुझा ऐकन्याची ,खरच इतकी होती का मला घाई?

होते नव्हते भाव-बंध सारे ,क्षणात निखळुन पडले
तरी आठवणीं शिवाय तुझ्या जगणे, मला आजही का नाही जमले?

****

तुझ्याशी तस मला खुप काही बोलायचय,
मनातल माझ्या ,सार काही सांगायचय,
पण ,"बोलून टाक ना रे,अजुन किती वाट पहायला लावशील",
ह्या तुझ्या एका वाक्यासाठी मला मुद्दाम गप्प रहायचय

****

प्रेम मिळ्त की मिळवाव लागत?
कुणी म्हनत कराव, कुणी म्हनत आपसुक होवून जात

कुणी म्हणत हां तर नशिबाचा खेळ
कुणासाठी हां मात्र दोन मनांचा मेळ

कुणी म्हणत प्रेमात भेटतात फक्त विरहाच्या आठवणी
कुणी गात प्रेमात आयुष्याच्या सुखांची गाणी

खरच प्रत्येकाच प्रेम इतक वेगवेगळ असत?
मग का हो म्हणतात "तुमच आमच प्रेम अगदी सेम असत" ?

****

ती नेहमी विचारायची,
लिहन्यात एवढ दुःख आनतोस कुठून?
मी हसून विषय सोडून द्यायचो,
बोलायचो मात्र काहीच नाही.
सांगू तरी तिला काय अणि कसं,
की ही तूच दिलेल्या घावांची बोचनी आहे,
दुसर दुःख तस माझ्याकडे काहीच नाही.

****

सगळच स्पष्ट कस ग सांगू तुला,
थोड तू ही माझ्या मनातल ओळ्खुन घे.
व्यक्त होवून तू तुझ्यातुन,
प्रेम शब्द माझ्यावरचे,एकदातरी सांगुन दे.

****

'तूच हवीस,तूच हवीस' असा सारखा दंगा माजवी,
पण "होशील की नाही माझी?",ह्या प्रश्नात मात्र अडकून जाई
आता तूच काय ते समजवाव माझ्या ह्या मनाला
कारण तुझ्याशिवाय तो आता कुणाचाच ऐकत नाही.

****

तीच ते नेहमीच माझ्याशी कोडयात बोलणं
त्या कोड्याच्या उत्तरात माझ तासन-तास झुलनं
कधी वाटायच तीही माझ्या प्रेमात आहे की काय?
पण परत विचारत लोटून द्यायच मला ,तीच ते अनोळखी वागण.

****

नव्या नव्या किरणात,रूप तुझ नहालेल,
पुष्पगुच्छात जस एक गुलाब बांधलेल.
ओठी पसरलेल्या तुझ्या हास्याची जादू ,काय ती वर्णावी
जणू सडा पसरविला होता,पुनवेच्या चांदण्यानी.

****

प्रेमात परत कुनाच्यातरी,पडायच मला नाही,
स्वप्नात कुठल्याही आता, फिरकायाच ही नाही,
तुटलेल काळीज माझ जोड्लय मी कसबस,
पण पुन्हा एकदा विरहाच दुःख झेलायची,
ताकद आता माझ्यात नाही

****

गुंतलो तुझ्यात तर त्रास होतो
अणि सुटलो तर सर्वत्र तुझाच भास् होतो.

****

वाटलच कधी प्रेमात पड़ाव अस तर एकदा माझ्याच प्रेमात पड
हात हातात देवून तुझा ,साथ आयुष्याची मागुन तरी बघ

गालातल हासू,डोळ्यातले आसू
करून स्वाधीन माझ्या , तुझ्या स्वप्नातल जग
मिठीत माझ्या एकदा सामावून तर बघ.

-प्रफुल्ल शेंड्गे

गुलाब आणि ती

हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ घेवुन ती केव्हाची  उभी होती...वाट पाहून पाहून थकली होती कदाचित ..पण थकल्या नजरेनेही ती वाट पाहतच होती..मी दुरूनच तिच्या चेहर्यावरचे भाव टिपले...हलकी हलकी पावले टाकत मी तिच्या पाशी जात होतो...तिने माझ्या कड़े पाहिल...माझी पावले तिच्याकडेच येताना पाहत ती मनातून खुश होत होती...एका क्षणी मी तिच्या अगदी समोर येवून उभा राहिलो...ती नजर वर करुण माझ्या नजरेत पाहत होती...मी काहीतरी बोलेल ह्या आशेने तिने कान टवकारले होते...का कुणास ठावुक मला का वाटल आणि मी तिच्या समोर गुडघ्यावर बसलो...तिच्या चेहर्याकड़े पाहतच...काहीच न बोलता मी माझा हात तिच्या समोर पुढे केला...तिनेही क्षणाचा विलंब न लावता त्या पुष्पगुच्छातुन एक गुलाब अलगद काढून मला देवू केला...बहुतेक मी ही मनात ह्याच क्षणाची आणि तिच्या ह्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होतो...तिने देवू केलेला तो गुलाब मी स्मितहास्य करीत स्वीकारला...माझ्या ह्या स्मितहास्याने तिच्या चेहर्यावरही एक वेग्ळाच आनंद पसरला, निरागस डोळ्यात विलक्षण तेज आल होत...वाटत होत तिचा तो आनंद कायम डोळ्यात साठवून ठेवावा...

मग मीही माझ्या खिशात हात घालून एक नोट बाहेर काढली...आणि तिच्या हातावर टेकवली...10-12 वर्षाची गडद पिवळा फ्रॉक घातलेली, अनवाणी पायाने तळपत्या उन्हात गुलाब विकत उभी असलेल्या तिने उरलेले पैसे पुन्हा मला देवू केले...गोंडस आणि निरागस त्या गुलाबकळि च्या चेहर्यावरचे भाव  आणि त्यावर ओसंडून वाहणारा आनंद  त्या लाल टपोरी गुलाबाला फीका पाड़त होता...खरच इतक्याश्या एका गुलाबात ही इतका भलामोठा आनंद लपलेला असतो हे तेव्हा कळाल.

-प्रफुल्ल शेंड्गे
Http://prafulla-s.blogspot.in

प्रेमम- एक सिनेमा

एक मल्यालम सिनेमा पहायचा योग आला...प्रेमम (Premam) ...2015 ला प्रदर्शित झालेला मल्यालम सिनेमा. नावावरून तुम्हाला लक्षात आलेल असेलच की हां प्रेमावर आधारलेला सिनेमा आहे. तस मला मल्यालम समजत नाही..पण टाइम पास म्हणून बघत होतो...सुरुवातीचे 10-15 मिनिट काहीच समजत नव्ह्त काय चाललय ते.बोर व्हायला लागल पण त्यानानंतर मात्र कहानिने एक वेगळाच वेग पकडला..सिनेमाचा हीरो.. जॉर्ज अर्थात नीवीन पौली...जॉर्ज ची दहावीची परीक्षा झालीय आणि ह्या वयात जे बहुतेक जनांच्या बाबतीत घडत तेच त्याच्या बाबतीत ही घडायला लागल होत..प्रेमात पडायला लागला होता तो..पडायला काय पडलाच होता प्रेमात...मेरी तीच नाव...दिसायला इतकी सुंदर की कुणी ही तिच्या प्रेमात पड़ाव अस...अनेक जनांच्या कालजाचा ठोका चुकायचा तिला पाहून ...त्यात हां जॉर्ज ही होता...तिच्या वरच प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला प्रेमपत्र द्यायला तिच्या मागे जानारा तो आणि त्याचे दोन मित्र...मेरीच्या वडिलाना समोर पाहून कशी धूम ठोकतात ते पाहून हसू कण्ट्रोल करन मुश्किल.  त्याची तिला सांगण्याची धडपड अविरत सुरु असतेच पण शेवटी पहिल प्रेम ना ते ,पूर्ण कस होणार?
वर्ष पुढे सरकत जातात...कहानी सुरु होते ती  कॉलेज च्या दिवसातली..सुरुवातीला एकदम शांत, सज्जन वाटणारा जॉर्ज आता कॉलेज मधला एक टपोरी मुलगा झालाय. जुनिअर्स ची रैगिंग करणारा, राडे घालणारा,पण अगदीच खुप सीरियस वगेरे नाही...त्या वेळी पहिल्यांदा भेटते ती "मलर" अर्थात सई पल्लवी...मलर जॉर्ज च्या कॉलेज मध्ये एक शिक्षिका म्हणून नव्याने रुजू होते..अगदी पहिल्या भेटीत नाही पण तिला पाहून जॉर्ज च्च्या हृदयाची धडधड वाढायला लागते....तिच्या अभिनया इतकी तिहि तितकीच सुन्दर...तिला पाहून कुणाचीही दांडी गुल होइल अशी...तिहि हळुहळु जॉर्ज च्या प्रेमात पडायला लागते...तो प्रेमात पडण्याचा अलगद प्रवास खुप छान मांडलाय आणि दाखवला सुद्धा आहे...त्यांची जुळत जानारी केमिस्ट्री तर अप्रतिम...शांत,प्रेमळ,बिनधास्त अस एक वेगळ कॉम्बिनेशन पहायला मिळत ते मलर च्या व्यक्तिरेखेत...पण इथ ही काही अनपेक्षित घडतच...तो सारा प्रसंग तुम्हाला थोडाफार सुन्न करूँ जातो...
काही वर्षानी कहानी पुढे सरकते...जॉर्ज चा बिज़नेस, सोबतीला असणारे त्याचे मित्र आणि जॉर्जला पुन्हा प्रेमात पाडन्यासठी एंट्री होते ती सेलिन ची...अनपेक्षित झालेली ओळख भूतकाळातल्या अनेक गोष्टींची सांगड़ घालून जाते.पण ह्या कहानित ही एक ट्विस्ट येतोच...सेलिन च आधीच ठरलेल लग्न...मग जॉर्ज काय अणि कस मैनेज करतो ते पाहताना हसू आवरत नाही .पण त्याच वेळी आपल्याच मनात भीती सुरु होते ती जॉर्ज ची ही प्रेम कहानी तरी पूर्ण होणार की नाही ह्याची.
शेवट गोड जरी केलेला असला तरी शेवटी अस काही घडत की उगाच मनाला चटका लागल्यासारख वाटत राहत...आणि ह्या एंड पेक्षा ...तो दुसरा एंड हवाहवासा वाटायला लागतो...पण काहीही असल तरी हां सिनेमा इतर प्रेम काहनी पेक्षा नक्कीच खुप वेग्ळा आहे..डोक्यातच काय मनात एक वेगळीच जागा निर्माण करतो...
सिनेमात भरपूर जन नव्खे असले तरी अभिनय सर्वांचाच उत्तम...पहिलाच सिनेमा करणारी सई पल्लवी तर कायम लक्षात राहते. जॉर्ज..अर्थात निविन पौली बद्दल तर काय बोलायच, ला..ज..वा..ब. सुरुवातीचा, मधल्या भागात आणि शेवटी जो जॉर्ज तुम्ही पाहता ना तेव्हा सारख वाटत राहत हां आधिचाच आहे की हां कुणी दुसरा हीरो तर नाही ना? अभिनयासोबत सिनेमातल संगीत ही तितकच सुंदर, आणि कैमरा मध्ये कैद केलाल दक्षिण भारतातल निसर्ग सौंदर्य वेगळाच फिल देतो.

पूर्ण सिनेमा बघून समजत का हां माल्याल्म मधला 2015 चा सर्वात जास्त कमाई केलेला,तर मल्यालल्म मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा का ठरला आहे ते.
एका शब्दात जर सिनेमाच वर्णन करायच असेल तर खरच " कट्यार काळजात" घुसवानारा सिनेमा असच म्हणता येईल.
भाषेची बंधन तोडून आपलासा करायला लावणारा हा सिनेमा तुम्हाला कधी पहायला मिळाल तर नक्की पाहा...प्रेमम

-प्रफुल्ल शेंड्गे
Http://prafulla-s.blogspot.in

रात्रीची दुनिया

रात्र .... रात्र म्हटल ना माझ्या डोळ्यांवर लगेच झोप आलीच म्हणून समजा , भारी असत राव गुपचूप झोपून ,जगाला विसरून ,आपल्या स्वप्नात बुडून जायचा विचार ,काही तासांसाठी का होईना आज आणि उद्याचा दिवस, त्यातल रोजच टेन्शन विसरुन जायला... पण ह्या आठवड्यात माझ्या अशा ह्या विचारला ब्रेंक लागला होता.नाईट शिफ्ट होती ना माझी ऑफिस मध्ये .

नाईट शिफ्ट साठी ऑफिस मध्ये आलो , ऑफिस मध्ये येताना रस्तावर माणसांची बरीचशी वर्दळ होती , घरी परतण्याच्या ओढीने सर्वांची पाउले जरा जास्तच घाई घाईत पडत होती ,तर काही जन रस्त्यालगतच्या विविध खाण्याच्या गाड्यावर आपली भूक शमवत होते, मी मात्र आज प्रवाहाच्या दिशेच्या विरुध्द चालत होतो. ऑफिस मध्ये येवून मी माझ्या कामाला लागलो , जस जसा वेळ सरत होता , तस-तशी खिडकीच्या बाहेर असणारी दुनिया शांत व्हायला लागली होती ,गाड्याचा आवाज , रस्त्यावरून फिरणाऱ्या माणसांची गर्दी , लोकलची धडधड सार शांत शांत होत चालल होत ,आवाज येत होता तो फ़्क़्त ऑफिस मधल्या फिरणाऱ्या पंख्यांचा ,घडाळ्यातल्या टिकटिकिचा ,मधूनच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आणि माझ्या किबोर्ड वर होणार्या टाइपिंगचा .

रात्र जशी डोक्यावर यायला लागली तशा माझ्या डोळ्यांच्या पापण्या जड व्हायला लागल्या होत्या म्हणून माझ्या कामातून एक छोटासा ब्रेंक घेवून मी खिडकीतून बाहेर बघायला लागलो ,रोज घोड्यासारख धावणार शहर काहीस संथ झाल होत , दिवसभर धावपळ करणारी लोकल ट्रेन कारशेड मध्ये डुलकी घेत आराम करताना दिसत होती ,रस्त्याचे सिग्नल, पिवळे दिवे पेटवत एकटेच उभे होते त्यामुळे हायवे वरून धावणाऱ्या गाड्या अगदी सुसाट धावत होत्या, रस्त्याच्या बाजूला लावलेले दिवे , इमारती वरचे दिवे चमचम करत होते , जणू दिव्यांची माळ पेटत आहे का असा अनुभव येत होता त्या पेटलेल्या दिव्यांकडे पाहताना ,समोरच्या एका ऑफिस मधल्या एका माळ्यावरचे सुद्धा लाईट पेटलेले होते ,बहुतेक तिथ हि कुणीतरी माझ्यार्ख जाग असाव . हळूच वर आकाशात नजर फिरवली , चांदण्यांनी आकाश भरून गेल होत. त्या चांदण्यांच्या मधून स्वताचा प्रकाश घेवून लुकलुकत एखाद विमान उडताना दिसत होत , चंद्राच्या प्रकाशात काही ढगांची हालचाल जाणवत होती , चोरपावलांनी , चंद्राला स्वत खाली झाकून ते ढग त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघत होते . ऑफिस च्या सहाव्या मजल्यावरून रात्रीच्या प्रहरी जगाला शांत झोपलेलं मी पाहत होतो , तरी मनात एक विचार होता , खरच , हि रात्र जितकी शांत वाटतेय ती खरच सगळ्यांसाठी इतकी शांत असेल का ? रात्रीच्या झोपेत फ़्क़्त स्वप्न न पाहता रात्रीच्या या मंद प्रकाशात रात्रीचा दिवस करून स्वताची पाउलवाट शोधणारे , जगण्यासाठी धडपडणारे असतीलच कि , कोणीतरी-कुठेतरी-कुणाच्यातरी काळजीने , ओढीने जाग असेल ना ... असेल कुणीतरी आपल्यासारख रात्री जागून पुन्हा दुपारी झोपुन स्वप्न पाहणार.

रात्रीला म्हणा किंवा अंधाराला आपण सारेच थोडेसे घाबरून असतो , अंधार आपल्याला नकोसा वाटत असतो पण ह्या रात्रीच्या अंधाराची आणि त्यातल्या जिवंतपणाची वेगळीच मजा असते . डोक्यात हे सारे विचार करत मी एकटक खिडकीच्या बाहेर पाहत होतो ,रात्रीच ते वेगळ विलोभनीय दृश्य न्याहाळत .शांत राहूनही ती रात्र माझ्याशी खूप काही बोलू पाहत होती ,मलाही तिच्याकडून खूप काही ऐकायच होत पण हवेत पोकळी निर्माण व्हावी आणि सारे शब्द विरून जावेत अस काहीस झाल होत त्या वेळी .माझ्या मनातल्या विचारांची मालिका चालूच होती तोच कारशेड मधल्या लोकल ने होर्न दिला , त्या आवाजाने मी माझ्या विचारातून बाहेर येवून घडाळ्याकडे पाहिलं , पहाट झाली होती , दिवसाची पहिली लोकल तिच्या कामाला निघायला तयार होती..मग मी हि माझा हा दहा मिनिटांचा ब्रेंक संपवून पुन्हा माझ्या कामाला लागलो. सोबत एक प्रश्न डोक्यात घेवून तो म्हणजे "स्वताला आणि स्वतासाठी जगायला लावणारा दिवसाचा गोंधळ चांगला कि रात्रीचा , तुम्हाला स्वतासोबत जगाचाही विचार करायला हा शांतपणा चांगला ?"

-प्रफुल्ल शेंडगे .

अबोल

सेकण्ड शिफ्ट करून ऑफिस मधून बाहेर पडलो...रात्रि 09:13 ची  लोकल पकडली...तय वेळी लोकलच्या त्या डब्ब्यात गर्दी कमीच होती
...डब्यातले हँडलस लोकलच्या स्पीड प्रम्माने जोर-जोरात स्वताच्याच मस्तीत हालत होते...कानात हेडफोन घालून FM वरच्या रेडिओ जॉकी ची बडबडि सोबत गाण्यांची मजा घेत लोकल च्या दारात उभा राहून वारा तोंडावर झेलत माझा प्रवास चालु होता...गाडी पुढच्या स्टेशन वर येवून थांबली आणि निघायलाही लागली...कानात वाजत होत शाहरुखच "तुझे देखा तो ये जाना सनम..." तोच कसलासा आवाज झाला .....मी आवाजाच्या दिशेने पाहिल ...

दुसर्या बाजुने घाईघाईत "ती" डब्ब्यात शिरली...घाईघाईत आल्याने तिचा श्वास फुलला होता...दम घेत कापाळावरचा घाम अलगद रुमालाने पुसत ती स्वताला सावरत होती...एका क्षणी तिची नि माझी नजरानजर झाली...दोघांच्याही नजरा पुन्हा दूसरी कड़े वळल्या...रोखून एकमेकाना पाहन दोघानाही जमत नव्ह्त...कारण प्रत्येक नजरानजरित आम्हाला आमचा भूतकाळ आठवत होता...बोलायच दोघानाही होत तरी आम्ही मुद्दाम गप्प...बहुतेक FM वाल्याना माझी कथा माहिती होती की काय असच काहिस वाटत होत आणि त्या क्षणी FM वर वाजत होत एक काळजाला भिडणार" मेरे नसीब में तू है के नही..."  हे गान...

पण खर सांगू ती आज ही तशीच दिसत होती..जशी पहिल्यांदा दिसली होती तशीच फरक मात्र एकच होता तिच्या गळ्यात आलेल मंगलसूत्र...आमच स्टेशन आल आम्ही दोघही खाली उतरलो..मी मुद्दाम हळुहळु पावल टाकत होत आणि ती मुद्दाम जोर जोरात पाउले टाकत निघून जात होती...मी तिला दूर जाताना पाहत होतो.. पुन्हा FM नि माझ मन जानल आणि माझ्या मनातल गान वाजवल...जे फक्त तिलाच डेडिकेट ..." खुश रहे तू सदा...ये दुवा है मेरी"

-प्रफुल्ल शेंड्गे
(काल्पनिक कथा)

उन्हाळा

आपल्याकडे साधारणपने तीन ऋतू आहेत - उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा .

पाउस आला कि सगळे कसे आनंदित होतात . पाउसाच कितीतरी कौतुक केल जात , त्याच्यावर कविता , लेख , त्याच विलोभनीय वर्णन केल जात . अगदी शाळेतला लहानसा मुलगा हि परीक्षेत "माझा आवडता ऋतू " विचारल कि सरळ "पावसाळा "अस लिहून त्यावर लांबलचक लिहायला लागतो . तसच हिवाळ्याच हि , गुलाबी हवा , अंगावर रोमांच आणणारे थंड वारे , धुक्याची चादर अस खूप काही लिहल जात , बोलल जात . उन्हाळ्या बाबतीत पण लिहन्या सारख खुप काही आहे .हां किंबहुना एकच असा रुतु असावा ज्याच्याबाबतीत आपल्या मनात समिश्र भावना असतील. एकीकडे नको वाटणारा उकाडा, अंगाची लाही लाही करणार उनं... तर दुसरीकडे   शाळेच्या दिवसात मिळनर्या उन्हाळ्या सुट्ट्या तर सर्वाच्यांच आवडीच्या , सुट्टीत मामाच्या गावाला जायची ओढ़, हवेहवेसे वाटणारे खायला भेट्नारे आंबे आणि इतर रानमेवा, झाडाना फुट्नारी नविन पालवी तर मन प्रफुल्लित करुण जाते...अजुन अस खुप काही . असच ह्या उन्हाळ्याचा विचार करायला लागलो होतो , तेव्हा ह्या उन्हाळ्यत प्रामुख्याने जे संमिश्र वातावरण अनुभवयाला मिळ्त त्या विषयी लिहावस वाटल...

तापलेल्या जमीनीला
गरम वाफेच्या भेगा .
चिंब चिंब अंगावर
ओल्या घामाच्या रेघा .

उकडणाऱ्या छताला
लटकलेला मंदावलेला पंखा .
चालू आहे कि बंद ?
मनात सारखी शंका .

घशाला कोरड
अंगाला चटके .
गरम गरम वार्याचे
झोंबणारे फटके .

चिडलेला सूर्य
अन गप्प गप्प झाडी .
तळपत्या रस्त्याला सुखावणारी
गारेगार आईस्कीमची गाडी .

बर्फाचे गोळे
माठातलं पाणी .
उन्हाळ्याची सुट्टी
सोबत ,रानमेव्याची मेजवानी .

आंब्याची फोड
अन शहाळ्यांची साथ .
पोटातल्या आगीला
कलिंगडाची खाप .

कुठे पानगळ
तर कुठे फुले नवी पालवी .
मित्रांसोबतची मारलेली, खोल
विहरितली डुबकी .

नकोशा वाटल्या
जरी ह्या उन्हाळी झळा .
पण पावसाचा गारवा
समजावून सांगे, तो हाच "उन्हाळा "  .

-प्रफुल्ल शेंडगे .

खुप काही

गर्दीत सार्या ह्या चालताना
स्वताची वाट शोधायचीय
अस्तित्व बनवाया स्वताच
जगाकडून खूप काही शिकायचंय

दुखाच्या झळा सोसत
सुखाच्या वनात नाचायचंय
अनुभवावर लिहायला
अजून खूप चेहरे वाचायचेत

जमिनीला स्पर्शून पाय
आभाळाला हात टेकायचेेत
इतक मोठ व्हायला
अजून खूप काही करायचंय

माणसातल माणूसपण जोडून
स्वतातला माणूस घडवायचाय
आणि रोजच्या मरण्यातुन उसंत घेवुन
दोन क्षण "खर" जगून पाहायचंय

-प्रफुल्ल शेंडगे

आनंद

ज्ञान , आनंद ह्या अशा गोष्टी आहेत ज्या एकमेकांशी वाटल्याने वाढत जातात . ज्ञानाच ठीक आहे वाटता येइल पण आनंद कसा वाटायचा ? आनंद हि अशी भावना आहे जी मनातून व्यक्त होते , ते दुसर्याला कस अनुभवायला देवू शकतो आपण ? आपण कस कुणाला आनंदी करू शकतो ?, इतके मोठे थोडीच आहोत आम्ही ? असे अनेक प्रश्न पडले असतील ना तुम्हालाही ?

पण खरच कुनाला आनंदी करण  म्हणाव तेवढ अवघड काम नाहीये . अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत हि खूप सारा आनंद सामावलेला असतो , फ़्क़्त तो आपल्याला ओळखून समोरच्याला देता आला पाहिजे इतकच . कुणाला आनंदी करायला खूप काही मोठ करायची , महागड काहीतरी द्यायची अशी काही गरज नसतेच कधी ,.कुणाचा तरी वाढदिवस मुद्दाम लक्षात ठेवून त्याला शुभेच्छा देवून पाहा , शाळेतल्या किंवा कॉलेज मधल्या एका मित्राला अनपेक्षित फोन करून त्याच्याशी मनसोक्त बोला , रोज कुणीतरी तुम्हाला न चुकता मेसेज करत असेल तर एकदा तुम्ही त्याच्या आधी त्याला मेसेज करून पाहा , एका लहान मुलाला एखाद चोकलेट देवून पाहा , कुणाची तरी आवड लक्षात ठेवून त्याची आवड आठवणीने त्याला सांगा , त्याची आवड जपा , झाडाखाली एकांतात बसलेल्या आजी-आजोबांशी दोन घटका गप्पा मारा , लहान मुलांच्या सोबत लहान बनून खेळून तरी पाहा, कुणालातरी निश्वार्थी मदत करून पाहा. अशी कितीतरी कारण तुम्हाला अजून भेटतील कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य पसरवायला , अगदीच काही नाही तरी किमान एक छानस स्माईल तर नक्कीच देवू शकता कि . तुमच हे अस अनपेक्षित आनंद देण समोरच्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक , एक वेगळा उत्साह भरून देयील . दोन क्षण का होईना तो त्याच्या डोक्यातले बाकीचे विचार बाजूला सारून तुम्ही दिलेल्या आनंदाबाबतीत नक्कीच विचार करेल ,त्याचबरोर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही एक वेगळीच स्फूर्ती आणि जगण्याचा उत्साह देत राहीलच कि .

शेवटी आपण जे देवू तेच आपल्याला परत कधीतरी नव्याने मिळणार असत . मी तर केलिय सुरुवात , तुम्हीही करताय ना सुरुवात कुणाला तरी उगाच आनंदी करून पाहायची ?

-प्रफुल्ल शेंडगे .

मन मौजी

मन हे मुक्त असत . त्याला जस हव तस ते वागत असत . फुलपाखराप्रमाणे उडत असत . कधी ह्या विचारात अडकून राहत तर दुसर्याच क्षणी दुसर्याच विषयात बुडायला लागत . आपल मन कधी आपल्या ताब्यात नसतच , आपण आपल्या मनाप्रमाने वागतो अस आपण कायम बोलत असलो तरी किती तरी वेळा आपण आपल्याच मनाला मुरड घालत जगत असतो .

किती वाटत असल कि शांत बसून राहावं , स्वतात रमून जाव ,उगाच एकांतात चालत राहाव ,पुस्तक छातीशी कवटाळून डोळे बंद करून खिडकित बसाव , कधी वर टेकडीवर जावून एका झाडाच्या सावलीत निवांत बसाव , त्या टेकडीवरून संपूर्ण शहराला ठेंगण पाहाव , कधी समुद्र किनारच्या वाळूत बसून सूर्यास्त डोळ्यात साठवून घ्यावा , अगदी चांदण्या पाण्यात पडेपर्यंत बघत रहाव , रस्त्यावर चालताना एखाद आवडीच गान कानावर पडल कि वाटत सरळ नाचाव , जोरात गान गाव , स्वताशीच बडबडत राहाव, लहान मुलांसोबत त्यांच्या सारख लहान होवून खेळत राहाव, बालिशपने मित्रांच्या खोड्या काढाव्यात  . अस खूप काही वेगवेगळ करावास वाटत राहत पण बघणारे काय म्हणतील , "वेडा झालाय का ? " अस बोलले तर ? , "त्यापेक्षा नकोच " अस म्हणत आपण ते करण टाळतो .बहुतेक ज्या गोष्टी आपल्याला कराव्याश्या वाटतात पण करता येत नाही त्याला आपल्याच मनातली भीती कारणीभूत असते , कोण काय बोलेल ? , होईल कि नाही? , अस केल तर काय होईल ? अस आपणच स्वताला घाबरवायला लागतो आणि जे आपण म्हणत असतो ना "मनमौजी जगन " ते कुठ तरी दूर पडायला लागत . 


मान्य आहे सगळ्याच गोष्टी जमतीलच अस नाही पण अगदी तसच नाही तरी पण थोड बहुत मनाला आणि स्वताला समाधान वाटेल अस करायला काय जातय?  , अर्थात ज्याचा बाकी कुणाला त्रास होणार नसेल तर . पुन्हा कधीतरी करू अस म्हणत राहिलो तर नंतर -नंतर करता करता सगळच राहून जावू नये म्हणून थोडस खरच मनाला वाटत तस मुक्त जगून पाहायला हरकत काय ?

-प्रफुल्ल शेंडगे .

वधु-परीक्षा की वर-परीक्षा?

"वधू परीक्षा" अर्थात मुलगी बघण्याचा कार्यक्रम. लग्नाच्या आधीचा मानला जाणारा सर्वात महत्वाचा टप्पा. बघण्याचा कार्यक्रम म्हणजे फ़क़्त मुला-मुलींचीच नाही तर त्यांच्या घरच्या मंडळीची , नातेवायकांची भेट, त्यांचे विचार ,स्वभाव ओळखण्याची एक सुरुवात असते . कित्येकांना त्यांचा आयुष्याचा जोडीदार ह्या अशाच बघण्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटतो . पण ह्या साऱ्याच वेगळ टेंशन हि असतच . मुलीच्या मनाची स्तिथी , तिला काय वाटत असेल हे आपण वाचून , ऐकून असलाच . पण ह्या बघण्याचा कार्यक्रमात फ़्क़्त मुलीलाच नाही तर मुलालाही पारखल जातच कि मुली कडच्या लोकांकडून . म्हणजेच हि फ़्क़्त "वधू परीक्षा" च नाही तर "वर परीक्षा" पण असतेच . जस मुलींच्या मनात भीती , उत्सुकता असेल तर मुलांच्या पोटात हि भीतीचे फुलपाखर उडत असतीलच कि त्या वेळी .

मुलांच्या हि मनात धाकधूक असते , मुलीला तो पसंत पडेल कि नाही . बघायला जाताना कस तयार होवून जाव इथून सुरुवात होते . लोकांना वाटत मुलाच काय? , एखादी कोणतीही पेंट- शर्ट ची जोडी घातली कि झाल . नाहीच काही तर सरळ जीन्स तर आहेच कि , पण आता काळ बदललाय , मुल हि स्वतच्या दिसण्याकडे जास्तच लक्ष द्यायला लागलीत . मुलगी बघायला जाताना कोणते कपडे घालायचे , साधे फॉर्मल कि आणखी काही . दाढी वाढवून जायचं कि क्लीन शेविंग करून , बूट घालू कि सरळ सैंडल घालाव . सारच कंफ्यूजन ,कुणाला विचारव म्हणून आईला विचारल तर ती एक सांगते , बहिणीला विचार ल तर आणखी एक उत्तर येत , फ्रेंड ला विचारल तर भलतच उत्तर मिळत . गुंता सुटायचा सोडून आणखी वाढत जातो ,त्यात महत्वाचा प्रश्न असतोच "तिला " आवडेल का ? कसातरी एक निर्णय घेवून तयार होतो आणि मुलीच्यांकड़े निघायला लागतो .

रस्त्यात घरातले सारेच मंडळी , उपदेश द्यायला लागतात , हे अस वागायचं , तस वागायचं , स्पष्ट आणि जोराने बोलायचं . त्यांचे उपदेश ऐकत-ऐकत एकदाचे पोहचतो घरा जवळ कि , शेजारचे काही जन रोखून बघायला लागतात , कुजबुज सुरु होते . त्यांची हि कुजबुज ऐकून पोटातल्या फुलपाखराच वाटवाघूळ व्हायला लागत . तसच नजर झुकवून मुलीकडच्या घरच्यांना नमस्कार करत , एकदाच आसनस्थ होतो . पण डोक्यात विचार चक्रासारखे फिरायला लागतात , कपाळावर हलकासा आलेला घाम अलगद रुमालाने पुसायला लागतो , कोरड्या पडलेल्या घशासाठी पाण्याचा ग्लास उचलावा तर आणखी एक प्रश्न , पाणी वरून पिवू कि ग्लास ला तोंड लावून , वरून पिताना अंगावर सांडल तर ?, तोंड लावून पिल तर काय बोलतील हे ?, मग हळूच नजर फिरवायची आणि कुणी बघत नाहीये अस बघून दोन घोट तोंड लावून घटकन पाणी प्यायचं आणि ठेवायचा तो ग्लास टेबलावर एकदाचा . मुलाचे आणि मुलीचे आई वडील बोलन सुरु करतात , आधी इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असतात , मुलगा मात्र तोपर्यंत नजर थोडी खाली घालूनच गप्प बसलेला असतो ,. मधूनच नजर वर करून इकड तिकड पाहिलं तर एका दुसर्या खोलीतून भिंतीच्या आडून कोणीतरी नातेवाईक चोरून पाहत असतात , थोडा कुजबुजल्याचा आवाज येतो , असा आहे मुलगा -तसा आहे, अस त्याचं न सपष्ट ऐकू येणार बोलन चालू असत . आधीच हृदयाची धडधड वाढलेली असते त्यात ह्या कुजबूजीने आणखी अस्वस्थ व्हायला होत , हाता पायाचे तळवे गार पडतात ,मग हाताचे तळवे एकमेकांवर घासत स्वताला कंट्रोल करायला लागत . तोपर्यंत कुणीतरी बोलत "मुलीला बोलवा ", हा शब्द ऐकला कि विचारत गुंतलेल मन ताडकन जाग होत , बसल्याच ठिकाणी शर्टाचा इन निट केला जातो , चेहऱ्यावरून हात फिरवला जातो , सुकलेल्या ओठांवरून हळूच जीभ फिरवून ओठांचा कोरडेपणा झाकायचा प्रयत्न चालू होतो , त्यातच एक पाय उगाच थरथरायला लागतो , हृदयाचे ठोके तर दुप्पट वेगाने वाजत असतात , कस तरी स्वतला सावरत नजर वर करून पाहायला लागतो तोच किचन मधून साडी नेसलेली , नजर झुकवून , अलगद पावल टाकत , थरथरत्या हातात चहाचा ट्रे घेवून "ती" येते . सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच रोखलेल्या असतात , मग एक एक करत सगळ्याना चहा आणि सोबत ठरलेले कांदेपोहे दिले जातात . दोन मिनिट शांतता असते , थोड मनाला बर वाटत असत तोच आणखी एक कुणी तरी बोलत "मुलीला काय विचारायचं आहे ते विचारा ", प्रश्न मुलीला जरी विचारयचे असतात तरी मुलाच्या मनात हि भीती सुरु होते , कॉलेज मधले एक्सटर्नल आणि जॉब इंटरव्यू च्या पेक्षा इथल्या प्रश्न उत्तरांच टेंशन खूपच असत . एक एक करत मुलीला नाव , शिक्षण , आवडी निवडी असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात , मुलगा मात्र शांत राहून सगळ ऐकत असतो . त्याची अवस्था त्या कसाई वाल्याकड़च्या बोकडासारखी असते , ज्याला माहिती आहे कि पुढचा नंबर त्याचाच आहे . तोच त्याचे आई-वडील बोलतात , तुम्हाला मुलाला काही विचार्याच असेल तर विचारा . आता मात्र हलकीशी अंधारी येते डोळ्यांसमोर , तरी अगदी तयार असल्यासारखा तो चेहऱ्यावर भाव आणायला लागतो . प्रश्न सुरु होतात , उत्तर द्यायच्या आधी आठवायला लागतात ते घरच्यांनी येताना दिलेले उपदेशाचे डोस. घसा थोडासा खाकरत स्पष्ट आवजात उत्तर दिली जातात . प्रश्न संपतात तेव्हा काळ्यापाण्य्च्या शिक्षेवरून सुटल्या सारख वाटत. पण अजून खूप बॉम्ब फुटायचे बाकी असतात , आणि पुढचा बॉम्ब आपल्याच घरातली माणस टाकतात . "तुला काही विचारायचं आहे का मुलीला तर विचार ", त्यावेळी नजरेत किंचितसा राग भरत तो त्याच्या आई वडिलांकडे बघतो आणि मनात विचार करतो , "कधी मुलींशी बोलायचं नाही बोलणारे आज अचानक प्रश्न विचार म्हन्तायेत ,व्वा ". आता विचारल नाही तरी प्रोब्लेम आणि विचारले तरी प्रोब्लेम ,प्रश्न विचारायच्या आधी केबीसी मध्ये अमिताभला बघतात तसे सगळेच नजर रोखून मुलाकडे बघायला लागलेले असतात , धीर करून पहिला प्रश्न विचारला जातो "नाव काय तुझ ?" ह्या प्रश्नासोबत सगळे हसायला लागतात , "अरे मगाशीच सांगितल ना नाव तिने ". स्वताची फजिती झालेली लक्षात आल ना कि गप्पच बसव लागत , ती मान खाली घालुन , हासू आवरत उत्तर देते . मग कुठे जिवात जीव येतो , मग दुसरा प्रश्न , असे एक दोनच वर वरचे प्रश्न विचारून तो गप्प होतो .

मग फ़्क़्त दोघांना गप्पा मारायला बसवलं जात . हे तर आधी पेक्षा अवघड काम असत , पहिल्यांदा कधीच न भेटलेल्याला नक्की काय आणि कस बोलायचं हा प्रश्न दोघानाही पडतो . त्याला वाटत असत ती सुरुवात करेल तिला वाटत तो बोलेल , दोघ हि शांत . भिंती आडून काही नजरा अजूनही बघत असतातच त्याच हि वेगळ दडपण . पण मुलांनीच सुरुवात करायची असा अलिखित नियम ठरवून दिलाय ना , मग तोच एक विषय काढून बोलायला लागतो . ती अजूनही थोडीशी मान झुकवुनच उत्तर देत असते , पायाच्या अंगठ्याने फरशी कोरायला लागते , तिचा अस्वस्थपणा , अवघडलेपणा जाणवायला लागतो . त्याला हि काही सुचत नाही कारण तो पण थोड्या फार फरकाने त्याच अवस्थेतून जात असतो . बोलण्यासाठी वातावरण अनुकूल करायचा प्रयत्न चालू असतो , मुद्दाम छोटासा जोक , तिच्या आवडी-निवडी अस विचारण सुरु होत , ती हि तिच्या कोशातून बाहेर येवून विचारायला सुरुवात करते . पण प्रत्येक प्रश्नाच उत्तर खुप विचारपूर्वक दिल जात ,एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न चालू असतो , पण त्या काही मिनिटात सार काही जाणून घेण शक्यच नसत पण वरवरचा स्वभाव मात्र नक्कीच समजतो . मगापासून साठवलेली भीती काहीशी दूर झालेली असते . मग बघ्ण्याच्या कार्यक्रम आपटून निरोप घेतला जातो तो "विचार करून निर्णय कळवतो " ह्या ठरलेल्या वाक्यातुंच. पण निघताना आता सुटकेचा निश्वास सोडायचा कि होकार / नकाराच टेंशन घेवून जायचं ह्या द्विधा मनस्थित पुन्हा मन अडकत .

पण काही म्हणा , बघण्याच्या ह्या कार्यक्रमात थोडी जास्तच गंमत असते .हो ना ? तुम्हीसुद्धा माझ्यासारखे ह्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या अनुभवापासून सध्या तरी दूर असाल तर तयार राहा ह्या सार्या गोष्टीना . आणि ज्यांना अनुभव आहे त्यांना आम्ही काय सांगाव ? त्यांच्या डोळ्यासमोर आलेच असतील ते दिवस .

-प्रफुल्ल शेंडगे