बदलय तरी काय ?


सायलेंट मोड बदलून फ्लाईट मोड वर गेलो , 
वेज नॉन -वेज च्या वादात आम्ही उपाशीच मेलो , 
काळा पैसा असतो काय अजून दिसला नाही , 
बॉर्डर वरती सैनिक माझा आजही मारला जाई , 
महागाई ने तर ठेवलाय आमच्या घशावारच पाय, 
मग जगण्यात आपल्या फरक पडलाय तरी काय ?


 इथल्या दुष्काळासाठी ह्यांचा परदेशात दौरा , 
मृगजळाच्या पाठी धावतोय आम्ही आजही सैरावैरा . 
दारिद्र्यात माझ्या होरपळून शेत हि गेल जळून , 
पैकेज च्या नावाखाली गेले ते पोकळ आश्वासन देवून. 
झाडाला लटकून मेलेल्या बापाला ,पाहत होती माय 
सांग तुझ्या माझ्या आयुष्यात बदलय तरी काय? 


गायी वरून आजकाल तापलय मोठ रान , 
पोरीच्या काळजीने तुटतोय आजही आई-बापाचा प्राण. 
आज ह्यावर उद्या त्यावर सुरु आहे बंदी , 
हीच आहे का ती चांगल्या दिवसांची नांदी ? 
चेहरे आणि नाव सोडून ,इथ काहीच बदलल न्हाय. 
आणि जगण्या-मरण्यात आज अंतर उरलय तरी काय ?


 -प्रफुल्ल शेंडगे .

म्हैसूर च्या वाटेवर ....

            काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , मी इंजिनीरिंग च्या अंतिम वर्षात असतानाची , कॉलेज च्या इंडस्ट्रियल विजिट कम पिकनिक साठी आम्ही बंगलोर, म्हैसूर अणि उटी ला गेलो होतो ... त्या विजिट मधल्या दिवसांच्या आठवणी तर खुप सार्या आहेत पण त्यातलीच विजिट च्या शेवटच्या दिवशीची आठवण थोड़ी जास्तच लक्षात राहण्या सारखी होती ...

          उटी वरून आम्ही म्हैसूर ला रात्री किमान ०९:०० च्या सुमारास हॉटेल वर पोहचलो , जेवणाला अवकाश असल्याने हॉटेल रूम वर जावून फ्रेश होवून आमचा ५ जणांचा ग्रुप एक रपेट मारण्यासाठी निघाला , हॉटेल च्या त्या रस्त्यावर त्या वेळी म्हणावी तेवढी वर्दळ नव्हती , मजा मस्ती करत आम्ही म्हैसूर च्या त्या अनोळखी रस्त्यावरून चालत निघालो , प्रवासा वरून आल्याने पोटात थोडी भूक वाढली होती म्हणून आम्ही खाण्यासाठी काही भेटत काय ह्याचा शोध घ्यायला लागलो , थोड पुढ गेल्यावर फुटपाथ वर भेल,पाणी-पुरीची एक गाडी दिसली , सगळ्यांनाच भूक लागल्याने आम्ही पटापट स्वतःसाठीच्या ऑर्डर्स दिल्या , मनात उत्सुकता होती कि म्हैसूर मधली हि पाणी-पुरी,भेल ची चव आपल्या इथल्या सारखीच असेल का ह्याची ... शेवटी जेव्हा त्या पाणी पुरी वाल्याने आमच्या आमच्या खाण्याच्या प्लेट्स आमच्या हातात दिल्या ती खावून मात्र थोडा हिरमोडच झाला .... अगदी जिभेवरची चवच गेल्याचा अनुभव आला ..सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते त्याक्षणी ... कशीबशी आम्ही ती संपवली आणि ह्या हरवलेल्या जिभेच्या चवीला परत आणण्यासाठी आणखी थोडी पायपीट सुरु केली , काही अंतरावर पिझ्झा स्टोर दिसला आणि आम्ही सार्यांनी आमचा मोर्चा तिकडे वळवला , एक पिझ्झा आणि त्या एका कोल्ड्रिंक च्या बाटलीवर आम्ही अगदी तुटण पडलो , पण आता टाइमपास साठी काय करायचं म्हणून त्या रिकाम्या बाटलीचा उपयोग करून ट्रूथ अणि डेअर खेळाला सुरुवात केली , ज्याच्याकडे बाटलीच तोंड असेल त्यांनी बाकीच्यांनी सांगितलेलं काम करायचं किंवा विचारलेल्या प्रश्नच खर खर उत्तर द्यायचं ,खरंच मनातल सार गुपित काढून घ्यायला तर हे सारे मित्र मंडळी आधीच टपलेले असतात आणि त्यात असल्या खेळामुळे तर त्यांना आयतीच संधी मिळत होती , तसही कुठल्या हि मित्रांचा ग्रुप जमला न कि त्यात्त होणारी मजा, मस्ती वेगळीच असते , आमच्या ह्या मस्तीने आणि हसण्याच्या आवाजाने ते पिझ्झा स्टोर दुमदुमत होत , पण आमच्यातला प्रत्येक जन एकच प्रार्थना करत होता कि त्या बाटलीच तोंड त्याच्या समोर येवू नये इतकच ... पण त्या बाटलीनेही सगळ्यांची गुपित फोडायचं ठरवलच होत कि काय अस वाटत होत ... त्या खेळात माझा प्रत्येक मित्र मला अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळत होता , गुपितांचे रहस्य फोडताना त्या मागची त्याची किंवा तिची स्थिती , विचार काय होता ते कळत होत ... मनात साठवून ठेवलेल्या आठवणी, भाव अगदी नकळत ओठांवर येत होते कि काय अस वाटत होत , थोड इमोशनल करणारे तर कधी दिलखुलास हसवणारे किस्से ऐकून आणि सांगून मनातून फ्री झाल्यासारखं वाटत होत ... आणि समोरचे ऐकणारे हि तितक्याच मनपूर्वक ऐकून घेणारे असले ना तर स्वर्ग गाठावा असच भासत . सगळ्यांची गुपित फोडून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेल च्या दिशेने निघालो ..  

              पण येताना जे भाव विचार होते ना आमच्या मनात ते आता थोडे बदललेले होते , कॉलेज च हे आमच शेवटच वर्ष होत ह्यानंतर आही सारे वेगळ्या-वेगळ्या वाटेने जाणार होतो .. त्याची हूर-हूर मनात वाढायला लागली होती ... रोज भेटणारे चेहरे काही दिवसांनी धूसर होणार होते ह्याची जाणीव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली होती ... हळूच का होईना प्रत्येकजण डोळ्याचा काठ अलगदपणे पुसत होता ... अस वाटत होत कि आयुष्यभर ह्या रस्त्यावर असच चालत रहाव थांबूच नये कुठहि, बहुतेक हि माझ्या एकट्याच्या मनातली भावना नसेल, सगळ्यांच्या मनातहि हेच चालू असाव त्याक्षणी पण कुणी बोलून दाखवत नव्हत इतकच ...

         आजकल रोज जरी आमची गाठ भेट होत नसली तरी त्या म्हैसूर च्या रस्त्यावर माझ्या सोबत चालणारी ती मित्रांची फौज आणि आणि त्यांच्या आठवणी आजही मनात तितक्याच गडद आहे.

                                                                                                              - प्रफुल्ल शेंडगे 
 
 

नेत्रानी बेट


              तसा काय मी अगदी भटका वगैरे नाही पण दुर्गम किंवा नैसर्गिक ठिकाणी जायची संधी आली तर मी ती सोडत हि नाही  ...असाच एकदा एका बेटावर जायचा योग आला , भटकळ , कर्नाटक मधील पश्चिम किनार्यावरच एक शहर , नोकरी निम्मित्त मी तिथ वास्तव्याला होतो , जानेवारी महिन्यात माझ्या एका स्थानिक मित्राने बेटावर जाण्यासाठी बोलावल होत , प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात स्थानिक लोक त्या बेटावर जात असत  , हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची देवालये आहेत त्या बेटावर आणि त्या देवालयात वर्षातून एकदा पूजा केली जाते  हवामानाचा आणि बाकी सार्या भौगोलिक आणि नैसर्गिक गोष्टींचा अंदाज घेवून एक दिवस ठरवला जात असे , मित्राच्या ह्या निमंत्रणामुळे आणि त्याने केलेल्या बेटाच्या वर्णनाने माझी हि उत्सुकता वाढली आणि मी जराही विलंब न लावता होकार दिला .
             रविवार च्या दिवशी सकाळी 7 वाजता सागरी बंदरा वरून  जायचं ठरल होत त्या प्रमाणे मी आणि माझे एक सहकारी आम्ही ६-६:३० च्या सुमारास घरातून  बंदराच्या दिशेने गाडी वरून निघालो , जानेवारी चा महिना असल्याने हवेत चांगलाच गारवा सुटला होता आणि गाडीच्या वेगाने तो आणखीनच जास्त जाणवत होता , रस्तावर दाट धुक्यानी चादर ओढली होती , मन प्रफुल्लीत करून जाणार वातावरण होत ते सगळ ,  १० -१५ मिनिटांच्या  प्रवासानंतर मासळी चा एक उग्र वास जाणवायला लागला आणि त्या वासानेच कळल  कि आम्ही बंदरा जवळ पोहचलो होतो  ,आकाशात  सूर्य हलकासा उगवला होता आणि सगळीकडे निसर्गाने अगदी मुक्त पणे रंग पसरले होते, मासळी च्या तो उग्र वासाची आता जणू काही सवय झाल्यासारखी नाहीसा झाला होता. बंदरावर पोहचलो तेव्हा नौकांची जणू फौजच उभी होती एका बाजूला एक अशा अनेक नौका एका रांगेत उभ्या होत्या , त्यावेळी माणसांची गर्दी तशी विरळ होती पण जस जशी वेळ पुढे जात होती तशी माणसांची गर्दी वाढत गेली  , मी आणि माझे सहकारी आम्ही एका दुकानाच्या कट्ट्यावर जावून बसलो तिथे बसलले एक आजोबा आमची विचारपूस  करत होते पण ते कन्नड मध्ये बोलत असल्याने मला तेवढ काही उमजत नव्हत  पण माझ्या सहकार्यांना कन्नड माहित असल्याने ते त्याची उत्तर देत होत होते आणि मला हि ते काही गोष्टी ट्रान्सलेट करून सांगत होते ..... सुमारे ८:३० च्या सुमारास आम्ही बोटीवर चढलो , मित्राच्या घरचीच बोट असल्याने आम्ही एका चांगल्या जागी जावून बसलो अर्थात फोटो काढण्यासाठीच आम्ही मोक्याची जागा शोधली ,ज्या बोटीने आंम्ही प्रवास करणार होतो ती काही प्रवासी बोट नव्हती , मासेमारीची बोट होती पण आजच्या दिवशी ती स्वच्छ करून  सकाळीच तिची पूजा करून ती तयार ठेवली होती , जशी जशी माणस  चढली तशी एक एक नौका सुरु झाली , किमान १०-१२ नौकांची तोफ एका मागून एक निघायला लागली , का कुणास ठावूक पण माझ्या  मनात एक वेगळ्याच प्रकारची हूर हूर सुरु झाली होती , पण सभोवतालची दृश्याने माझ्या ह्या हूर-हुरीला थोडस बाजूला सारल , आणि मी त्या निसर्गाच्या अद्भुत  चमत्काराच्या जाळ्यात अडकून गेलो , सकाळची सूर्याची कोवळी किरणे समुद्राच्या पाण्यावर चमकू लागली होती , आणि जस जस आम्ही बंदरापासून दूर होत गेलो तसं चोहीकडे फ़्क़्त पाणीचपाणी, आणि त्या क्षणी मला ती बोट म्हणजेच एक बेटा समान भासू  लागली होती  ज्याच्या चोहीकडे फ़्क़्त पाण्यचा वेढा.

                 
               जस जसा सूर्य डोक्यावर येवू लागला तसं उन्हाच्या झळा नकोशा होवू लागल्या होत्या , सुमारे दीड तासांच्या प्रवासानंतर  आम्हाला त्या बेटाच सुस्पष्ट दर्शन व्हायला सुरुवात झाली , एखाद्या बुरुजाप्रमाणे हा बेट होता.. ”नेत्रानी ”  ह्या नावाने बेट ओळखला जात असे  ... ह्या बेटावर आधी नेव्ही च्या अण्वस्त्राच्या चाचण्या केल्या जात पण कालांतराने ह्या वर बंदी आणली गेली होती ....खरच नेत्रांना सुखावह होत त्या बेटाच बोटीतून होणार दर्शन , जस जशे आम्ही  बेटाच्या जवळ जात होतो तसं त्या समुद्राच्या पाण्याचा नीला रंग गडद होत जात होता जणू काहि सारा नीळा आकाश त्यात बुडला होता कि काय ह्याचीच प्रचीती येत होती  ..आणि मधूनच एखाद्या डॉल्फिन ने मारलेली उडी पाहायला मिळत होती ....अगदी विलोभनीय दृश्य होत ....आम्ही सारेच त्या डॉल्फिन ची उडी कॅमेरात बंद करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यात काही आम्हाला यश मिळाल नाही ... आता आमची नौका बेटाच्या जवळ येवून उभी राहिली तेव्हा मला कळाल कि आता त्या  बेटच्या पायथ्याशी छोट्या होडीने जायचे आहे , भुवया थोड्या उंचावल्याच  माझ्या ,कारण भर समुद्रात मोठ्या नौकेतून उडी मारून दुसर्या एका छोट्या होडीत जायचं होत ....हृदयाची धड धड वाढली होती , पण मन थोड घट्ट केल आणि बाकींच्या बरोबरीने मीही दुसर्या होडीत प्रवेश केला,  आणि त्या बेटाच्या पायथ्याशी पोहचलो ,बेटावर  इतकी गर्दी पाहून कुणाला  वाटणार नाही कि हे एक निर्जन बेट आहे , एखाद्या गावाप्रमाणे माणसांची गर्दी जमली होती .




                  आता आणखी एक दिव्य समोर होत ते म्हणजे ते बेट चढून जायचं .... पण ह्या गोष्टीला मी अगदी उतावळा होतो,  मोठे मोठे आणि काळेभोर पाषाना वरून चालायला  आम्ही सुरुवात केली एका हातात कॅमेरा घेवून सारे क्षण बंद करण्यासाठी चालेली खटाटोप , आणि मनात बेट चढण्याचा उत्साह , झाड्याच्या फांद्या , वेलींना पकडून आम्ही  चढत होतो, आधी मोठे मोठे पाषाण नंतर घसरणारी मातीची पायवाट तुडवत  कसाबस आम्ही एकदाचा तो बुरुज रुपी बेट सर करून बेटाच्या वरच्या भागात पोहचलो , आणि मंदिरात जावून दर्शन घेतल आणि पुन्हा  आम्ही आमच्या भटकंती ला सुरुवात केली , मंदिरात जायचे म्हणून चप्पल बाहेर काढून ठेवली होती आणि आम्ही तशाच उघड्या पायांनी बेटाची सफर करायला सुरुवात केली, पायाला खडे टोचायला लागले होते , बेटाच्या वरच्या भागातून समुद्राच होणार  दर्शन अगदीच अवर्णनीय होत  , त्या अथांग सागराला शांत राहून स्वतःच काम करताना पाहून  जगण्याचा एक नवा पैलू सापडत  होता , आपण पण हि शांत आणि चिकाटीने आपल  काम करून आपल आयुष्य आणि कीर्ती ह्या सागरा प्रमाणे वाढवली पाहिजे असा संदेशच जणू तो आपल्याला देत होता  ..... त्या बेटावरून सभोवाताली आणि त्या बेटावरची निसर्गाने केलेली अलौकिक किमया जणू पूर्ण आयुष्यभर पाहत राहिलो तरी पूर्ण न होण्यासारखीच होती , पण आपल्यालाही वाहतच रहाव लागत ना एखाद्या नदी सारख सागराच्या ओढीने .... तासाभराच्या विश्रांती नंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला  .... पण जाताना त्या बेटाकडे परत परत वळून पाहून त्याचे सौंदर्या , त्याचा एकांतपणा आणि त्यावरची शांताता स्वतः सोबत नेता आली असती तर किती बर झाल असत असा विचार करत ...  आणि त्या सोबतच एक गान मात्र डोक्यात फिरत राहील ते म्हणजे  ....
परती च्या ह्या वाटेवरती असेच काही घडते 
निघता निघता वाटच अडते , पावलात घुटमळते    

पण काय करणार कितीही हव हवस वाटत असल तरी प्रत्येक गोष्टीची वेळ असतेच ना !... पण जणू काही सर्वांनी त्या बेटाला पुन्हा पुढल्या वर्षी आवर्जून येवू अस न बोलता वचन दिल होत कि काय असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.....

-प्रफुल्ल शेंड्गे

आणखी काय हवं ?



प्रेमळ नजर  नि  लाजून  हसण
दूर जाताना फिरून बघण
हळूच चोरून  तुझ  पाहण
नि मुक्या शब्दांनी खूप काही  बोलुन जाण


गुलाबी हवेत , तुझ रुसून फुगण
मुसळधार पावसात चिंब भिजण
रोजचं  एकांतात  आपल  गुपचूप  भेटण
नि  खांद्यावर डोक ठेवून तुझ अलगद निजण


मनातली ओढ आणि शपथेतली साथ
निरागस डोळ्यातला अतूट विश्वास
पाहता तुला भासे नेहमी प्रेम नवं
सांग ,प्रेमात पडायला आणखी काय हवं ?


--प्रफुल्ल शेंडगे .

दूर जरी मी...

दूर जरी मी तुझ्या 
का तुझ्यातच मी रमतो 
अश्रुंचे होती पाट 
अन त्यात तुलाच पाहतो 

सांजवेळीचा सूर्य 
आठवण तुझी मज देतो 
विसरून तुला जरी मी 
का तुझ्यातच घुटमळतो ? 


गंध मोगरयाचा हा 
आजही कसा दरवळतो ?
 तुटून गेल्या कळ्या 
तरी मनी गुलाब का फुलतो ? 


सुटून गेले हात 
काळीज दुभंगले होते 
उरी माझ्या तू प्रेमाचा
का घाव घातला होता?


 -प्रफुल्ल शेंडगे .